पंजे फौलादी मिले… मखमली दस्तानों के बीच!

0

एखाद्या माणसाकडे असामान्य कर्तृत्व असणे, ही जशी जमेची बाजू असते, तशी ती विरोधकांसाठी पोटशूळ निर्माण करणारीही असते. उत्तर महाराष्ट्रासारख्या राजकीय दृष्ट्या वाळवंटी प्रदेशात एकनाथराव खडसेंनी भाजपा बळकट केला. अनेक कार्यकर्तेही मोठ्या पदापर्यंत नेऊन ठेवले, तसेच कुटूंबातील सदस्यही सत्तेत सहभागी केले.

पण अति महत्वाकांक्षी आणि स्पष्टोक्तेपणा यामुळे निराधार आरोप करून जनाधार असलेल्या लोकनेत्यास सत्तेचा विजनवास पत्करावा लागला. भोसरी वगळता सर्वच आरोप निखलास खोटे ठरले आहेत. मात्र तरीही सरकार अभ्यासू नेत्याला न्याय देण्याच्या भूमिकेस विलंब का लावतेय…? हा प्रश्‍न उत्तर महाराष्ट्रातील जनतेला आहे. आज दहा महिने लोटले तरीही ही टंगळ-मंगळ का? या प्रश्‍नाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आजच्या चावडीत….

४ जून २०१६ पासून एकनाथराव खडसे मंत्रीपदावरून पायउतार आहेत. आज दहा महिने होत आली तरी सामाजिक आत्मभान जागृत असणार्‍या लोकनेत्यास न्याय नाही, विविध सहा प्रकारचे आरोप ठेऊन त्यांचा राजीनामा घेण्यात आला. पैकी ‘भोसरी’ प्रकरण वगळता सर्वच आरोपांतून त्यांना सरकारने ‘क्लीन चीट’ दिली. भाजपा महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ असलेल्या या नेत्यावर प्रथमच आरोप झालेत. आणि त्यांचा राजकीय ‘गेम’ झाला.

ही वस्तुस्थिती सर्वच जाणतात. गेम कुणी व का केला…? हे सुध्दा ‘ऑफ-द-रेकॉर्ड’ सर्वांनाच माहिती आहे. पण मग विरोधकही याबाबत शांत असतांना पक्षातून त्यांना न्याय का दिला जात नाही, हा प्रश्‍न ऐरणीवर आला पाहिजे.

आ.खडसेंवर अशा पध्दतीने आरोप प्रथमच करण्यात आले. त्यांच्या गेल्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचे ऐकीवात नाही. एवढा अनुभवसंपन्न नेता भाजपाकडे असणे ही पक्षासाठी जमेची बाजू असली पाहीजे. विधानसभेत बोलतांना विरोधकांवर जरब निर्माण करणारा… नैतिक वजनाच्या बळावर भल्या-भल्यांची पाचावर धारण बसविणारा… आणि कमालीचा स्पष्टोक्तेपणा बाळगणारा हा नेता पक्षाने एक प्रकारे अडगळीत का ठेवलाय? हा प्रश्‍न पक्षातील प्रामाणिक कार्यकर्ते, काही नेते आणि दस्तुरखुद्द विरोधकांनाही पडला आहे.

 

असे लागले ग्रहण..

असं म्हणतात ग्रहण आपोआप लागते, पण राजकीय पटलावर मात्र ग्रहणे लावली जातात, १४ मे २०१६ ला ३० कोटीच्या लाचप्रकरणी खडसे यांचे निकटवर्तीय गजानन पाटील यांना अटक झाली आणि तेथूनच ग्रहण लावता येईल का? याची उघड चाचणी खडसेंच्या विरोधकांनी (पक्षांतर्गत की पक्षाबाहेरील याविषयी संभ्रम) सुरू केली. त्यातच पकडलेला पाटील हा तीन महिने पोलीसांच्या निरीक्षणाखाली होता, असे मुख्यमंत्र्यांनी विधानसुध्दा केले होते.

त्यानंतर दुसरा आरोप लगावण्यात आला की, दाऊद इब्राहिमच्या कराचीतील निवासस्थानातील दूरध्वनी क्रमांकावरून खडसे यांच्या मोबाईलवर दूरध्वनी आल्याचा हॅकर मनीष भंगाळे याने आरोप केला. तसेच खडसे आणि दाऊद यांच्यामध्ये संभाषण झाल्याचाही आरोप ठेवला गेला. (इथिकल हॅकर म्हणून नावास आणलेल्या भंगाळे नामक पोराचे दुधाचे दात शाबुत असतांना त्याने केलेल्या आरोपाचे गांभिर्य कुणी आणि का घेतले, हे महाराष्ट्राने पाहिले) या वादात आप राजकीय पक्षाच्या प्रिती मेमन शर्मा आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. (त्यांना पोळी भाजू देण्याकरिता, गरम तवा कुणी उपलब्ध करून दिला, हे सुध्दा काहींना ठाऊक आहे.)

त्यानंतर दमानियांचे आझाद मैदानावरील उपोषण, आणि त्या उपोषणात इतर आरोपांसोबत खडसेंनी घराणेशाही राबविल्याचाही मुद्दा चर्चेत आला. हा मुद्दा सकृतदर्शनी खरा वाटत असल्याने खडसेंविषयीच्या विरोधाची धार तीक्ष्ण होत गेली. यात शंका नाही. त्यातच पुण्यातील भोसरी येथील सरकारी जमीन पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यासाठी पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका खडसेंवर ठेवला गेला. आणि या सर्व आरोपांचा परिपाक म्हणून खडसेंना राजीनामा द्यावा लागला.

chavdi logo

गढूळ आरोप निवळले तरी..

गेल्या दहा महिन्याच्या कार्यकाळात खडसेंवरील ‘भोसरी प्रकरण’ वगळता सर्वच आरोप खोटे असल्याचे सिध्द झाले आहेत. गजानन पाटील लाच प्रकरणी खडसेंचा संबंध नसल्याचे विभागाने स्पष्ट केले. भंगाळे नामक मुलाने दाऊद संभाषणाचा केलेला आरोपही सपशेल खोटा असल्याचे यंत्रणेने सांगितले.

परवा भंगाळेला एटीएसने बेड्याही ठोकल्या. अंजली दमानिया आणि प्रिती मेमन यांच्याही आरोपांची तथ्यता नसल्यासारखी आहे. आता कायदेशीरदृष्ट्या भोसरी प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. परंतु भोसरी परिसरातील संबंधीत पोलीस स्टेशनने सुद्दा या प्रकरणात खडसेंवर गुन्हा दाखल होऊ शकत नसल्याचे स्पष्ट लेखी दिले.

याप्रकरणी झोटींग समिती स्थापन करून चौकशीही पूर्ण झाली आहे. निर्णय मात्र लांबणीवर ठेवलाय. सन्माननीय न्यायालयाने काही सूचना या संदर्भात मांडल्या आहेत. मात्र त्या सूचनांचे तात्काळ पालन करून प्रकरण वेगाने मार्गी लावण्याचे धारिष्ट्यही सरकार दाखवायला तयार नाही. अशी सर्व परिस्थिती असल्याने उत्तर महाराष्ट्रातील जनतेलाही आता एकनाथराव खडसेंना न्याय मिळत नसल्याचे जाणवत आहे.

अब मिलाता हू उनसे हाथ,

तो लगता है डर…
पंजे फौलादी मिले है,
मखमली दस्तानों के बीच…

एकनाथराव खडसे या दिग्गज राजकीय नेत्यावर आजच्या स्थितीत लिहीतांना वरील शेर मात्र प्रकर्षाने आठवला. खडतर रस्त्यांवरती खाचखळगे, काटे-कुटे आणि खड्डे असले तर चांगल पायतण पायात घालून आपण निर्धोकपणे मार्गक्रमण करू शकतो, मात्र पायतणात (बुटात) जर एखादा बारीकसा खडा जरी असला, तरी चालणे मुश्कील होते. आणि बुटातला खडा जर आपल्याच जवळच्या माणसाने सरकावला असला तर आणखीच जिव्हारी लागतो… असो!

परंतु या ‘बॅड पॅच’मुळे पुरोगामी महाराष्ट्राला एकनाथराव खडसे यांच्यातील प्रचंड संयम बघायला मिळाला. अचानक आघात होऊन कधी काळी अवनत करण्याचा प्रयत्न राजकारणात झाला तर माणूस हादरून जातो. मात्र धीरगंभीर नेतृत्व असणार्‍या खडसेंचा कणखरपणा या निमित्ताने अनुभवास आला. सत्तेत सहभागी असतांनाही आणि विरोधी पक्षात असतांनाही कशी रणनिती असावी? याची जंत्री खडसेंकडे आहेच.

पण त्याचबरोबर पक्षाला आणि राज्याला आणखी उन्नत करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घालमेल संपवावी आणि निकोप पध्दतीने राजकारण व्हावे, ही अपेक्षा व्यक्त करणे गैर नाही!
मो.९५४५४६५४५५

LEAVE A REPLY

*