नेवाशात 95 गावांची सुरक्षा करताहेत अवघे 64 पोलीस

0
अपुर्‍या संख्येमुळे पोलिसांची होतेय अडचण

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- नेवासा पोलीस ठाणे हे नगर जिल्ह्यात अतीसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. तालुक्यात एकूण 3 पोलीस ठाणी असली तरी सर्वाधिक 95 गावांचा भार एकट्या नेवासा पोलीस ठाण्यावर असला तरी कर्मचार्‍यांची संख्या मात्र अवघी 64 आहे.

नेवासा येथील अवैध धंदे, वाळूतस्करी, गावठी कट्टे, मटका, दारू, चोर्‍या, टोळीयुद्ध या सर्व गोष्टींबरोबरच आता तरवडी दारू प्रकरणमुळे नेवासा पोलीस स्टेशन चर्चेचा विषय बनले आहे. त्यातच आपुर्‍या संख्याबळामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. नेवासा तालुक्यात एकूण 3 पोलीस ठाणी असून 121 गावे येतात. त्यापैकी नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्वाधिक 95 गावे आहेत. या गावांच्या सुरक्षेचा भार अवघे 64 पोलीस सांभाळत आहेत. या पोलीस ठाण्याअंतर्गत प्रवरासंगम व कुकाणा ही दूरक्षेत्रेही आहेत. अत्यल्प कर्मचारी संख्येमुळे काही घटना घडल्यावर विलंब झाल्यास नागरीकांकडून पोलीस निरीक्षकांना धारेवर धरले जाते व नागरिकांचा रोष पत्करण्याची वेळ येते.
नेवासा हे तिर्थक्षत्राचे ठिकाण असून येथे संत ज्ञानेश्‍वर मंदिर व श्रीक्षेत्र देवगड, नेवासा बुद्रुक येथील खंडोबा-म्हाळ्सा मंदिर ही मोठी तिर्थक्षत्रे आहेत. त्यामुळे नेवासा येथे भविकांची रिघ मोठ्या प्रमाणावर सुरु असते.
या पोलीस ठाण्याचे एकूण मंजूर संख्याबळ बघितले असता त्यात 3 अधिकार्‍यांसह 61 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यापैकी दररोज 8 ते 9 कर्मचार्‍यांची साप्ताहिक सुट्टी असते. वाढत्या घटनांच्या दृष्टीकोनातून ही संख्या अपुरी असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होत आहे.
झिरो पोलीस व होमगार्ड यांचे सहकार्य घेवून थोडीफार कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. कर्मचार्‍यांना होत आहे अपुर्‍या कर्मचारी संख्येविषयी येथे बदलून येणार्‍या सर्व पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे मागणी केली आहे मात्र वरिष्ठ अधिकर्‍यांकडून या मागणीला केराची टोपली दाखवली गेली आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांची अहमदनगर येथे गुन्हे अन्वेषण शाखेत बदली झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक ही जागा रिक्त आहे. त्यांच्या जागी लवकरात लवकर नवीन अधिकारी नेमणूक करण्याचीही गरज आहे.

नागरिकांना केवळ आश्‍वासने
नेवासा पोलीस ठाणे येथे पोलीस अधिक्षक यांनी वेळोवेळी भेट दिली असता नेवासा शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह पत्रकारांनी कर्मचार्‍यांची संख्या वाढवण्याची मागणी केली असता सर्वच अधिकार्‍यांनी आश्‍वासने देण्यापलीकडे कोणतीच कृती केली नाही.

95 गावांचे क्षेत्र असलेल्या नेवासा ठाण्यातील संख्याबळ
पोलीस निरीक्षक – 01
सहायक पो. निरीक्षक – रिक्त
पोलीस उपनिरीक्षक – 02
सहायक उप पो.निरीक्षक – 03
पोलीस हवालदार – 09
पोलीस नाईक – 16
पोलीस शिपाई – 23
महिला पोलीस – 10

LEAVE A REPLY

*