जिल्हाधिकार्‍यांना साकडे

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – पारनेर येथे जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी घेतलेल्या टंचाई आढावा बैठकीत पारनेरकरांनी कुकडीच्या डाव्या कालव्यातून तालुक्यातील तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याची आग्रहाची मागणी केली होती. त्या अनुषंगाने अध्यक्षा विखे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेत पारनेरकरांच्या पिण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कुकडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली.
बुधवारी अध्यक्षा विखे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी पारनेरला जाऊन तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतला होता. यावेळी तालुक्यातील जनतेने वडनेर, निघोज, वाडेगव्हाण, नारायण गव्हाण, कुरुंद, मावळेवाडी, यादववाडी, पाडळी रांजणगाव, चोंभूत आणि वडनेर या गावातील पाणीटंचाई थांबवण्यासाठी आणि सरकारचा पाण्याच्या टॅँकरवरील खर्च टाळण्यासाठी कुकडीच्या डाव्या कालव्याला पाणी सोडल्यास या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटेल असे सांगितले. त्यावर विखे यांनी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले होते.
त्यानुसार विखे यांनी काल जिल्हाधिकारी महाजन यांची भेट घेत या गावांतील पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी कुकडीच्या कालव्यातून साठवण तलावांत पाणी सोडण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

*