नियोजनाच्या अभावामुळे रुग्णांना मनस्ताप

0

साईबाबा व साईनाथ रुग्णलयात सात वर्षांपासून वैद्यकीय संचालक पदे रिक्त

 

नानासाहेब शेळके
शिर्डी – साईबाबांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत रुग्णसेवेला अनन्य साधारण महत्त्व देत रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा मानली. बाबांचा हाच वारसा पुढे सुरू ठेवत विश्‍वस्त मंडळाने बाबांच्या नावाने सुरू असलेले साईनाथ रुग्णालय रुग्णांसाठी मोफत केले. मात्र नियोजनाच्या अभावामुळे येथे रुग्णांना सेवेऐवजी मनस्ताप होत असल्याच्या घटना पहावयास मिळत आहेत. साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयात वैद्यकीय संचालकांचे पद गेली सात वर्षांपासून रिक्त आहे. सध्या प्रभारी डॉक्टर हे पद सांभाळत आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यामध्ये बेशिस्तीचे वातावरण पहावयास मिळत आहे.

 
साईनाथ रुग्णालयात गत पंधरवाड्यात कर्मचार्‍यांच्या दोन गटात तुफान हाणामार्‍या झाल्या. त्यावेळी दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात पळापळ झाली. ज्या रुग्णांच्या सेवेसाठी कर्मचार्‍यांची नेमणूक केली त्यांच्यापासूनच रुग्णांना त्रास झाला. यात रुग्णालय प्रशासनाचा नियोजनाचा अभाव दिसून येतो. दोन्ही रुग्णालयाच्या मंजूर आकृतिबंधानुसार दोन्ही हॉस्पिटलसाठी वैद्यकीय संचालकांचे पद मंजूर असून मात्र गत सात वर्षांपासून हे पद भरण्यात आले नाही.

 

या पदासाठी मास्टर ऑफ हॉस्पिटल अ‍ॅडमिनीस्ट्रेशन एम.एस., एम.डी. अशी शैक्षणिक अर्हता असलेला कॅन्डीडेट भेटत नाही. ही शैक्षणिक अर्हता धारण केलेले डॉक्टर ग्रामीण भागात काम करण्यास इच्छुक नाहीत. त्यांच्या मानधनाच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे हे पद रिक्त आहे. सध्या साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय संचालक म्हणून अतिदक्षता विभाग तज्ञ डॉ. नरोडे तर साईनाथ रुग्णालयात डॉ. मैथीली पितांबरे या प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या विभागाची जबाबदारी पाहून त्यांना हा अतिरीक्त भार देण्यात आला आहे. त्यामुळे व्यवस्थापन करतांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आकृतीबंधानुसार मंजूर असूनही हॉस्पिटलमध्ये बहुतेक विभागात तज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहे. चांगले डॉक्टर येथे येण्यास तयार नाहीत, याची अनेक कारणे आहेत. स्थानिक पुढार्‍याच्या नातेवाईक रुग्णाला चॅरीटी मिळवुन देण्यासाठी दबावाचा वापर केला जातो. हे काम न झाल्यास संबंधीताच्या तक्रारी केल्या जातात.

 

त्यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने अंग काढून घेतल्याच्या अनेक घटना आहेत. तसेच भरती झाल्यापासून वर्षानुवर्ष कर्मचारी एकाच जागेवर काम करत आहे. त्यामुळे त्यांच्यात निर्ढावलेपणा दिसून येतो. त्यामुळे वरिष्ठांचा आदेश झुगारण्यापर्यंत या कर्मचार्‍यांची मजल जाते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांबरोबर अर्वाच्च भाषा वापरणे, रुग्णांना वेळेत सुविधा उपलब्ध करुन न देणे असा प्रकार सर्रास पहावयास मिळतो. कर्मचार्‍यांना स्वयंशिस्त लावण्यासाठी दोन्ही हॉस्पिटलध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय संचालकांचे पद भरणे आवश्यक आहे. तसेच वर्षानुवर्षे एकाच जागेवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्यास त्यांच्या कामात शिस्त येईल.

 

साई समाधीला ऑक्टोबरमध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने जगभरातून साईभक्त शिर्डीत येतील. त्यांच्या आरोग्यसंदर्भात विश्‍वस्त मंडळाने वेळीच नियोजन करणे आवश्यक आहे. या काळात भक्तांना त्रास झाल्यास त्याची चर्चा जगभर होईल. साईबाबांच्या शिर्डीची प्रतिमा डागळली जाईल. असे होऊ नये यासाठी विश्‍वस्त मंडळाने वेळीच पावले उचलावीत अशी अपेक्षा साईभक्तांकडून व्यक्त होत आहे.

 

 साईबाबा सुपर हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयात काम केलेल्या काही डॉक्टरांनी खासगी हॉस्पिटल उभे केले आहेत. हे डॉक्टर येथील कर्मचार्‍यांना हाताशी धरून सुपर व साईनाथमध्ये येणार्‍या रुग्णांना त्या कर्मचार्‍यांद्वारे खासगी रुग्णालयात उपचार घेण्याबाबत प्रवृत्त करतात. येथे सुविधांचा कसा अभाव आहे हे कर्मचारी रुग्णांना पटवून देतात. रुग्णांना संबंधित डॉक्टरांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवितात. यात मोठ्या प्रमाणात ‘अर्थ’ पूर्ण तडजोडी होतात.

LEAVE A REPLY

*