नियमबाह्य – विनापरवाना गतिरोधक काढणार ; पोलीस व महापालिकेकडुन अपघात स्थळांची संंयुक्त पाहणी

0

नाशिक : शहरात गेल्या काही दिवसात रस्त्यांवरील गतिरोधक व चौकातील अडचणींमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत असुन अलिकडेच नवीन नाशिक व गंगापूररोड भागात अपघातात तीन चार जणांना प्राणास मुकावे लागले आहे.

याप्रकारामुळे शहर पोलीस व महापालिकेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या एकुणच पार्श्वभूमीवर आता शहरात नियमानुसार तयार न केलेले गतिरोधक काढुन टाकण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान शहर पोलीस व महापालिका यांच्याकडुन या अपघात स्थळांची पाहणी करुन उपाय योजना केल्या जाणार आहे.

अलिकडेच शहरातील नवीन नाशिक भागातील लेखानगर बालभारतीसमोर सर्व्हिस रोडवरील गतिरोधकावर दुचाकीवरुन पडुन ट्रक खाली सापडून कटारे नामक महिलेचा मृत्यु झाला होता. त्यापाठोपाठ उत्तमनगर कॉलेज – जनता विद्यालयासमोर गतिरोधकावर अपघातात भांबेरे नामक महिलेचा मृत्यु झाला.

या दोन्ही घटनेमुळे नवीन नाशिक भागात संतापाचा लाट पसरली होती. त्यानंतर काही दिवसांनी गंगापूर रोड भागात दुचाकी अपघातात दोन महिलांचा मृत्यु झाल्यानंतर याभागात तीव्र भावना व्यक्त झाल्या. याठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. शहरातील नवीन अंतर्गत व बाह्य रिंग रोड यांच्यासह काही प्रमुख रस्ते सिंहस्थ कुंभमेळ्यात नवीन व खड्डेमुक्त झाल्याने वाहनांची गति वाढली आहे.

यातच शहरात अनेक ठिकाणी नियमबाह्य गतिरोधक तयार करण्यात आले आहे. या दोन्ही कारणांमुळे निष्पाप व्यक्तींचा बळी जात असल्याने नागरिकांचा संताप बाहर पडत आहे. आता याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका आणि शहर पोलीसांकडुन या घटनास्थळांची संयुक्त पाहणी केली जाणार असुन अपघात टाळण्यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहे.

त्याचबरोबर शहरात अनेक कॉलनी, वसाहती, काही कॉलेज – शाळा याठिकाणी महापालिकेच्या परवानगी विना नियमबाह्य गतिरोधक परस्पर टाकण्यात आलेले आहे. हे सर्व नियमबाह्य गतिरोधक काढुन टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर विना परवानगी गतिरोधक टाकण्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडुन घेण्यात आला आहे.

शहरात अशाप्रकारे चार महिलांसह काही नागरिकांचा बळी गेल्यानंतर का होईना प्रशासनाला जाग आली आहे. महामार्ग सोडला तर बहुतांशी रस्ते महापालिकेच्या ताब्यात असुन त्यावर वाहतुक सुरळीत होण्यासाठी अगदी गतिरोधक, सुचना फलक, झेब्रा पट्टे, रिफ्लेक्टर, सिग्नल आदी उपाय योजना करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. हे काम महापालिका आणि शहर पोलीसांच्या समन्वयातून केले जाते.

प्रत्यक्षात या दोन्ही प्रशासनात समन्वय कागदावर राहत असल्याचे या अपघाताच्या घटनातून दिसुन आले आहे. सात आठ जणांचा बळी गेल्यानंतर आता प्रशासनाच्या समन्वयातून गतिरोधकांचे उंचवटे कमी करण्याचे आणि झेब्रा पट्टे लावण्याचे काम झाले आहे.

याचा अर्थ प्रशासनाकडुन लेखानगर व उत्तमनगर भागात गतिरोधक नियमबाह्य तयार केल्याचे समोर आले आहे. यापुढे अशा अपघातांना आळा घालण्यासाठी महापालिका व शहर पोलीसांनी कोणाच्या बळी जाण्याची वाट पाहु नये अशा प्रतिक्रीया नवीन नाशिक व गंगापूररोड भागातून ऐकायला येत आहे.

LEAVE A REPLY

*