नाशिक मुंबई हवाई प्रवास होणार स्वस्त ?

पुढील आठवडयात एअर डेक्कन आणि एचएएल प्रशासनात चर्चा

0

नाशिक (मनिष कटारिया) | छोटया शहरांना विमानसेवेने जोडण्याच्या उददेशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘उडाण’ योजना सुरू करण्यात आली. देशातील 45 मार्गावर जाहीर झालेल्या या योजनेत नाशिक शहराचाही सामावेश करण्यात आला असून नाशिककरांना अपेक्षित असलेली विमानसेवा आता निर्णायक स्थितीत आहे.

या योजनेत एक तासाच्या सेवेसाठी अडीच हजार रूपये प्रवास दर आकारण्यात येणार आहे. नाशिक मुंबई हवाई अंतर हे सुमारे 40 मिनिटांचे असल्याने या तिकिट दरात आणखी कपात करण्याचा विचार कंपनी प्रशासन करत असून याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता सुत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक येथून विमानसेवा सुरू व्हावी अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. याकरीता विविध पातळयांवर प्रयत्न सुरू आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ओझर येथे 85 कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेली टर्मिनसची इमारत केवळ विमानसेवेअभावी पडून आहे. यापूर्वीही अनेक विमान कंपन्यांनी ओझर येथून विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला.

मात्र कधी वेळेची अडचण, कधी प्रवाश्यांचा अल्प प्रतिसाद तर कधी एचएएल प्रशासनाकडे असलेला मनुष्यबळाचा अभाव यामूळे नाशिककरांचे हवाई सेवेचे स्वप्न अपूर्णच राहीले. ओझर विमानतळावर विमानसेवा सुरू होण्यासाठी सर्वप्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. हवाई नकाशावरही ओझर आल्याने विमानसेवा सुरू होण्यातील तांत्रिक त्रुटीही दूर करण्यात आल्या आहेत. नाशिकच्या उद्योग, पर्यटन विकासासाठी विमानसेवा गरजेची आहे.

आता तर केंद्राच्या ‘रिजनल कनेक्टिव्हिटी योजन’ेअंतर्गत (उडाण)नाशिकहून मुंबई आणि पूणे शहरे हवाई सेवेने जोडली जाणार आहे. नाशिकहून एअर डेक्कन कंपनीमार्फत ही सेवा सुरू केली जाणार आहे. याकरीता एअर डेक्कन आणि एचएएल प्रशासन यांच्यात पुढील आठवडयात बैठक होत आहे. यात विविध प्रकारच्या परवानग्यांसह , वेळेची उपलब्धता याबाबत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे.

उडाण योजनेअंतर्गत एक तासाच्या प्रवासासाठी अडीच हजार रूपये प्रवास दर आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र नाशिक मुंंबई हवाई अंतर हे सुमारे 40 मिनिटांचे असल्याने या तिकिट दरात आणखी कपात होण्याचे संकेत कंपनीप्रशासनाने दिले आहेत. याबाबतही याबैठकित निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामूळे नाशिक मुंबई हवाई प्रवास सर्वसामान्यांच्याही आवाक्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*