नाशिक जिल्ह्यात मद्यविक्रीत 50 टक्के घट ; महामार्ग दुकाने बंदचा परिणाम

0
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या महामार्गावरील दारू दुकाने बंदच्या आदेशानंतर या बंदीचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे. जिल्ह्यात बिअर तसेच विदेशी दारू विक्रीत थेट पन्नास टक्के घट आली आहे. याचा मोठा फटका उत्पादन शुल्कच्या महसुलाला बसला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर. बी. आवळे यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील निरीक्षकांची आढावा बैठक घेण्यात आली. यात ही बाब उघड झाली.

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर पाचशे मीटर अंतराच्या आत असलेली सर्व मद्यविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील अशा मद्य दुकानांना सील ठोकले आहे. तसेच त्यांचे परवाने 1 एप्रिलपासून नूतनीकरण केलेले नाहीत.

यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील जवळपास 70 टक्के बिअर बार, परमिट रूम, वाईन शॉप, बिअर शॉपी व देशी दारूची दुकाने अशा सर्वप्रकारची दुकाने बंद झाली आहेत. त्याचा मद्यविक्रीवर किती परिणाम झाला याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक महानगरपालिका व तालुका कार्यक्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात सर्वप्रकारच्या मद्यविक्रीवर त्याचा परिणाम झाल्याची आकडेवारी यावेळी सादर करण्यात आली. एकीकडे महामार्गावरील विदेशी दारूची विक्री पन्नास टक्क्याने घटली असताना देशी दारूच्या विक्रीत तीन टक्क्यांनी वाढ झाल्याने राज्य उत्पादन शुल्क खात्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

विदेशी दारूचे सेवन करणारे दारू मिळत नाही म्हणून देशी दारूकडे वळाले की देशी दारू सेवन करणारे नवीन ग्राहक तयार झाले याबाबत मात्र अधिकार्‍यांनी शंका उपस्थित केल्या. एकंदर महामार्गांवरील मद्य दुकाने बंदीचा मोठा फटका राज्याच्या महसुलास बसला आहे.

LEAVE A REPLY

*