नाशिकला जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा ; जिल्हाधिकार्‍यांनी दिला दिलासा

0

नाशिक : नाशिक महापालिकेसाठी शिल्लक असलेला पाणीसाठा जाहीर करत यंदा मुबलक पाणी असतानाही महापालिकेने काटसरीने पाणी वापरण्याचे आवाहन शहरवासियांना केले. परंतु शहरासाठी जूनअखेरपर्यंत पुरेल इतके पाणी नियोजन केले आहे. त्यामुळे नाशिककरांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज सांगितले. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा नियोजनशून्यतेचे दर्शन शहरवासियांना करुन दिल्याचे चित्र आहे.

पाऊस कमी झाल्याने गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाण्यावरुन वाद झाले. तसेच मोठे राजकारणही झाले. वाद सुरु असतानाच समाधानकारक पावसास सुरुवात झाली. धरणेही तुडूंब भरली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यामुळे यंदा पाण्याची चिंता राज्यभर नाही.

नाशिक शहरासाठी पाणी पुरवणारे गंगापूर धरणही 100 टक्के भरले आहे. त्यामुळे नाशिककरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची तीळमात्र शंका नसताना मार्चच्या पहिल्याच दिवशी महापालिकेने आगामी उन्हाळ्यासाठी तसेच पावसाळ्यापर्यंत 2323.31 दलघनफूट इतके पाणी शिल्लक असल्याचे जाहीर केले.

गंगापूर समुहात 2029.32 तर दारणात 293.99 दलघनफूट पाणी शिल्लक असल्याचे स्पष्ट करत काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले, पण शिल्लक असलेले पाणी मुबलक असताना महापालिकेने योग्य नियोजन केले नाही. विशेष म्हणजे दररोज 14.43 दलघनफूट इतक्या पाण्याचा उपसा महापालिका करते.

प्रत्यक्षात दररोज आवश्यक असलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी उपसा केला जातो. शिवाय त्याचा कुठे हिशोबही ठेवत नाही. गेल्या वर्षी अत्यंत टंचाईच्या काळात महापालिकेने होणार्‍या गळतीत सुधारणा केली नाही. यंदा पुन्हा अधिक पाणी असल्याने गळतीकडे दुर्लक्ष केले आहे. धरणातून होणारा पाणी उपसाव जलवाहिन्यांद्वारे होणारे वितरण यात जवळपास 40 टक्क्यांपेक्षा जास्त गळती होते.

अनेक नळांना तोटी नसल्याने त्यातून बरेच पाणी वाया जाते. या सर्व बाबी महापालिकेने यंदा भरपूर पाणी असल्याने दुर्लक्षित केल्या आहेत. त्यामुळेच आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा उपसा करावा लागत असल्याने आतापासून महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

परंतु यंदा महापालिकेला आवश्यक असलेले 4300 दलघनफूट पाणी आरक्षित ठेवलेले आहे. ते जूनअखेरपर्यंत पुरेल इतके आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनीच सांगितले आहे. असे असताना पुन्हा पाण्यावरुन महापालिका पुन्हा राजकारण करत असल्याने त्यांच्या नियोजनाबाबतच शंका उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*