नाले सफाई निविदेवरच गाळ!

0

कचर्‍यामुळे तुंबले नाले, रस्त्यावर वाहते गटारगंगा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवर्ती भागासह सावेडी, पाईप लाईन उपनगरामध्ये विविध भागातील नाले सफाईला मनपाकडून अद्याप मुर्हूत लागलेला नाही. या सर्व नाल्यांमध्ये टाकण्यात आलेल्या कचर्‍यांमुळे जवळपास शहरातील सर्व लहान-मोठे नाले तुंबलेले आहे. साचलेल्या कचर्‍यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना मनपाला नाले सफाईच्या निविदा प्रक्रियेतील दिरंगाईचा गाळ काढता आलेला नाही. त्यामुळे नाल्यांतील गाळ किती निघतो याबाबत साशंकताच आहे.

दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत मोठ्या नालेसफाईला सुरूवात होणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरासह उपनगरामध्ये नालेसफाईचे काम वेळेवर झाले नाही तर रस्त्यांवर पाणी साचण्याची समस्या उद्भवण्याचा धोका आहे. तसेच रस्ते खराब होऊन वाहन चालकांचेही हाल होऊ शकतात. शहर व उपनगरातील नाले तुंबण्यास मनपाच्या दुर्लक्षासोबतच नाल्यांमध्ये कचरा टाकणारे नगरकरही दोषी आहेत. सर्रासपणे शहरातील नागरिक नाल्यांमध्ये कचरा टाकतांना दिसत असून टाकण्यात येणार्‍या कचर्‍यांच्या त्रास मात्र, नाला परिसारात राहणार्‍या नागरिकांना होतांना दिसत आहे.

शहरातील विविध भागासह पाईपलाईन रस्ता, गुलमोर रोड आदी भागाची पाहणी केली असता, येथील नाल्यांवर असणार्‍या पुलांवरून नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जात असल्याने नाले तुंबण्याची समस्या गंभीर बनली असल्याचे चित्र दिसले. सिव्हल हडको शेजारी असणारा नाला, सारसनगरमधील नाला, पाईपलाईन रोडवरील नाला, कुष्ठधाम रोडवरील नाला, प्रेमदान चौक ते सावेडी नाका रस्त्यावर डौले हॉस्पिटलजवळ असणार्‍या नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूने कचरा टाकला जात आहे. या परिसारातील हॉटेलमधील कचरा, रस्त्यावर अतिक्रमण करणार्‍या नागरिकांनी टाकलेला कचरा हा सर्रास नाल्यात टाकण्यात येत आहे. या नाल्यामध्ये टाकलेला कचरा अनेकवेळा तेथेच पेटवण्यात येतो.
कचर्‍यामुळे हा नाला तुंबत असून त्याची दुर्गंधी सुटली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. नगर-मनमाड रोडवर सावेडी बसस्थानकापासून नागापूरकडे जाताना अवघ्या पन्नास मीटर अंतरावर असणार्‍या नाल्याचीही दुरावस्था झाली आहे. या नाल्यामध्ये तर कचरा गोण्यांमध्ये भरून टाकण्यात आला आहे. या गोण्या नाल्यामध्ये टाकण्यात आलेल्या पाइपलाइनमध्ये अडकण्याचा धोका आहे. पावसाळ्यापूर्वी या शहर आणि उपनगरातील नाल्यांची सफाईन न झाल्यास पावसाळ्यात नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. यामुळे मनपाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, यासंदर्भात मनपा प्रशासनाशी संपर्क केला असता, नालेसफाईची फाईल निविदा प्रक्रियेच्या भोवर्‍यात अडकली असल्याचे सांगण्यात आले.

शहरातील नाले सफाईला दोन दिवसांत सुरू होणार आहे. या कामाची फाईल निविदा प्रक्रिया रस्तावर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तातडीने नाले सफाईच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
– सुरेश इथापे, अतिक्रमण विभाग प्रमुख, मनपा.

 महापालिकेने गेल्या आठवड्यात माणसांच्या हाताने शक्य असणार्‍या लहान नाल्या, गटारी स्वच्छ करणच्या कामाला सुरूवात केली आहे. हे काम मनपा आरोग्य विभागाच्यावतीने कण्यात येत आहे. मात्र, गेल्या आठवड्यात गाजावाजा करून सुरू झालेले काम सध्या सुरू आहे की नाही, याची माहिती मनपा प्रशासन देवू शकले नाही. यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही मनपाची नाले सफाई मोहिम कागदावरच राहते की काय अशा शंका नगरकरांना येत आहे.

शहर व उपनगरामध्ये नागरिकांना कचरा टाकण्यासाठी ठिकठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था महापालिकेने केली आहे. या ठिकाणी टाकण्यात येणारा कचरा हा मनपा आपल्या घंटागाडीद्वारे घेऊन जाते. परंतु नाल्यांमध्ये किंवा ड्रेनेजमध्ये टाकण्यात येणारा कचरा हा उचलण्यात येत नाही. पावसाळ्यापूर्वी जरी नाले साफसफाई केली, तरी नाल्यांमध्ये कचरा टाकणार्‍यांचा बंदोबस्त केला नाही तर अवघ्या काही दिवसांमध्ये कचरा मोठ्या प्रमाणात साचून नाला तुंबण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्वात प्रथम नाले साफसफाई करतांना त्यामध्ये कचरा टाकणार्‍यांचा बंदोबस्तही महापालिकेला करावा लागणार आहे. पाईपलाईन रोडवर रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या ऐवजी नागरिक कुंडीबाहेर कचरा टाकतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

*