नालेसफाईला मुहूर्त

0

मनपाची आठ पथके कार्यरत : पुढील आठवड्यात यंत्राव्दारे स्वच्छता

अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाळा तोंडावर आलेला असतांना शहरातील नाले, गटारी सफाईला मुहूर्त मिळाला आहे. महापौर सुरेखा कदम आणि मनपाच्या अधिकार्‍यांचा फौजफाटा शहरातील विविध भागाची पाहणी केल्यानंतर ही मोहीम सुरू झाली आहे. मनुष्यबळाच्या सहाय्याने ही सफाई सुरू झाली असली प्रत्यक्षात यंत्राच्या साहय्याने मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेला पुढील आठवड्याची वाट पहावी लागणार आहे.

ुन्या शहरातील अरूंद गल्ली-बोळा, दाट लोकवस्ती, अरूंद गटारी या पार्श्‍वभूमीवर पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाई आवश्यक आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा देवूनही मनपाकडून शहरात नालेसफाईला दिरंगाई झाली. प्रशासकीय अनास्थेमुळे या स्वच्छतेच्या कामाला कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया लांबली. परिणामी, प्रत्यक्ष छोटे नाले सफाईचे काम शुक्रवारपासून सकाळपासून सुरू झाले असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.
पावसाळा जवळ आला असला तरी अद्याप मनपाकडून अद्याप मोठे नाले सफाईचे काम हाती घेण्यात आलेले नाही. शहरात 19 मोठे नाले व नदीपात्रात पाणवनस्पती असल्याने त्यातून पाणी वाहून जाण्यास अडसर होणार आहे. पावसाळ्यात शहरातून वाहत येणारे पाणी या नाल्यांतून जातांना पाणवनस्पतींमुळे ते तुंबून राहून नागरी वस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापौर कदम यांनी बुधवारी बैठक घेऊन या कामाचा आढावा घेतला व गुरुवारपासून शहरातील छोटे नाले सफाईचे काम सुरू होईल, असे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात या कामाला शुक्रवार उजाडला.
कामाचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी व अंतिम कार्यारंभ आदेशावर सह्या करण्यास वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया रखडली. अधिकार्‍यांच्या सह्या झाल्यानंतर कार्यारंभ आदेश तयार झाला, पण तो घेण्यास संबंधित ठेकेदार आला नाही. यामुळे गुरूवारचा दिवस वाया गेला असल्याची माहिती मनपातील सुत्रांनी दिली. छोट्या नाल्याच्या सफाईला शुक्रवारी सकाळपासून सुरूवात झाली. यासाठी मनपाने आठ पथके तयारी केली होती. प्रत्येक पथकात 10 व्यक्तींचा समावेश होता. शहरातील सिध्दार्थ नगर भागातील गवळीवाडा परिसारातील छोटे नाले स्वच्छ करण्यात आले. शुक्रवारी दिवसभर ही स्वच्छता मोहिम सुरू होती.

कत्तलखाने रडारवर
नगरमध्ये महापालिकेचा अधिकृत परवाना असलेला एकही कत्तलखाना नाही. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हा पोस्ट ऑफिस-जिल्हाधिकारी कार्यालय-सैनिक लॉन्सदरम्यानच्या गटारीत तसेच रस्त्यावर रक्तमिश्रित लाल पाणी असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. तसेच कत्तलखान्यांतील रक्त व मांसामुळे गटारी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याने बेकायदा कत्तलखाने बंद करण्याचा गांभीर्याने विचार सुरू झाला आहे.

दरम्यान महापौर कदम यांनी सोमवारपासून सर्जेपुरा, तेलीखुंट चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नगर कॉलेज समोरील भाग, पाईप लाईन रस्ता, नागापूर परिसर, गांधी नगर, काकासाहेब म्हस्के कॉलेज, गुलमोहर रोड परिसार, नागापूर, बोल्हेगाव आदी भागात पाहणी करून त्या भागातील लहान-मोठे नाले स्वच्छ करण्याच्या सुचना मनपा प्रशासनाला दिल्या आहेत.

आपत्कालीन कक्ष
पावसाळ्यात शहरातील बहुतांश रस्त्यांवरून पाणी वाहत असते. या पाण्यासमवेत असलेल्या कचर्‍याने गटारी तुंबतात व त्यातील घाण पाणी रस्त्यावर वाहते. याशिवाय जुन्या इमारतीच्या भिंती पडणे, झाडांच्या फांद्या तुटून पडणे व अन्य दुर्घटना होतात. त्या रोखण्यासाठी वा झाल्यानंतर तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी आपत्कालिन कक्ष केला जाणार आहे. नगररचना विभाग, बांधकाम विभाग व घनकचरा विभागाचे कर्मचारी या कक्षात कायमस्वरूपी असणार आहेत. याशिवाय प्रत्येकी 10 कर्मचारी असलेली आरोग्य विभागाची आठ पथके नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*