नारळी पौर्णिमेनिमित्त पद्मशाली समाजाची दिमाखदार शोभायात्रा

0

अहमदनगर(प्रतिनिधी)- नगर शहरात पद्मशाली समाजाच्यावतीने नारळी पौर्णिमा, हातमाग दिन व रक्षाबंधन उत्सवानिमित्त सोमवारी सकाळी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय महामुनींच्या मंदिरात रुद्राभिषेक, होम हवन, झाल्यानंतर हातमाग दिनानिमित्त (7 ऑगस्ट) हातमाग यंत्राची पूजनही करण्यात आले. यावेळी आयोजित भव्य शोभायात्रेचा शुभारंभ उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या हस्ते मार्कंडेय महामुनींच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला.

याप्रसंगी पद्मशाली पंचकमिटीचे अध्यक्ष संजय वल्लाकट्टी, मार्कंडेय देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम, अंबादास चिट्ट्याल, महेंद्र बिज्जा, ज्ञानेश्वर आडेप, रवी दंडी, विनोद बोगा, राधाकिसन म्याना, त्रिलेश येनगंदूल, उत्तम बल्लाळ,दत्तात्रय रासकोंडा, श्रीराम राजेश्वर आदिंसह मोठ्या संख्येने पद्मशाली समाजातील नागरिक आपआपल्या पारंपारिक वेषभूषेत सहभागी झाले होते.
मिरवणुकीच्या प्रारंभी पद्मनादम् ढोल पथकातील वादक ताला सुरात ढोल वाजवत होते. सजवलेल्या रथामध्ये मार्कंडेय महामुनींची प्रतिमा व पालखी ठेवण्यात आली होती. तसेच नारळी पौर्णिमेनिमित्त कलशाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. गांधी मैदान येथून सुरु झालेली ही मिरवणुक पापय्य गल्ली, चितळेरोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, संबोधी शाळा, नवरंग व्यायाम शाळा, काष्टागणेश चौक, बागडपट्टी, नेता सुभाष चौक, तेलीखुंट चौक, कापड बाजार, भिंगारवाला चौक, अर्बन बँक चौक मार्गे पुन्हा गांधी मैदानात आल्यावर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या भव्य दिमाखदार काढलेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते. आ. संग्राम जगताप यांनी चितळेरोडवर मिरवणुकीचे स्वागत करुन पालखीचे दर्शन घेतले.
नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त पद्मशाली युवाशक्तीच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांचे आयोजन दि.5,6,7 ऑगस्ट दरम्यान करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, हनुमान चालिसा पाठ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नारळी पौर्णिमेच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने होम हवन, यज्ञोपवित (जानवे) धारण करणे, रक्षाबंधन व मार्कंडेय महामुनींची महाआरती करुन उत्सवाची सांगता करण्यात आली. यानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

LEAVE A REPLY

*