नागवडे कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर

0

10 जून पासून नोंदी घेणार; कार्यकारी संचालक नाईक यांची माहिती

 

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – सन-2018-2019 च्या गळीत हंगामासाठी नागवडे सहकारी साखर कारखान्याने ऊस लागवड धोरण निश्चित केले आहे. सभासद, शेतकर्‍यांनी शिफारस केलेल्या ऊस जातींची लागवड केल्यास उत्पादन वाढ होईल. येत्या 10 जूनपासून शेतकर्‍यांनी ऊस लागवड करावी व तशी नोंद कारखान्याच्या शेतकी विभागात करावी असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी केले आहे.

 
ऊस लागवड हंगाम-2017-2018 चे व गळीत हंगाम सन-2018-2019 साठी कारखान्याने मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील शास्त्रज्ञांशी सल्लामसलत करून धोरण निश्चित केले आहे.

 

राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे असे सांगून नाईक म्हणाले की, कमी पाण्यात अधिक ऊस उत्पादन घेण्याचा प्रयोग शेतकर्‍यांनी करणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी ऊस संशोधनकर्त्या शास्त्रज्ञांनी को-86032, को.सी.-671, को.व्ही.एस.आय.-03102, एम.एस.-10001 व व्ही.एस.आय.-8005 या सुधारीत व अधिक उत्पादन देणार्‍या ऊस जातींची लागवड करावी. शिवाय ज्या शेतकर्‍यांना को. एम.-0265 जातीच्या ऊसाची लागवड करावयाची आहे. त्या शेतकर्‍यांनी 10 जून 2017 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीतच ऊस लागवड करावी. सन-2018-2019 च्या गळीत हंगामासाठी खोडवा ऊस नोंद करणेसाठी फेब्रुवारी-2018 अखेर गाळपास आलेल्या वा तुटलेल्या खोडवा उसाच्या नोंदी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 
शेतकर्‍यांनी शिफारस केलेल्या जातींच्या उसाची लागवड केल्यास वेळेवर ऊस तोडीचे नियोजन करणे सुलभ होईल. ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोड होणार असल्याने शेतकर्‍यांनी दक्षिणोत्तर दिशेने लांब पध्दतीने व किमान पाच फूट सरी पध्दतीचा अवलंब करून ऊस लागवड करावी. दोन ऊस रोपातील अंतर दीड ते दोन फूटाचे ठेवून लागवड करावी. या पध्दतीचा अवलंब केल्यास पाणी व खताची बचत तर होईलच पण ऊस उत्पादनातही लक्षणीय वाढ होईल असे सांगून नाईक म्हणाले की, ऊस उत्पादन वाढीसाठी व जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांनी शेणखत, सेंद्रिय खते यांचा वापर करावा. कारखाना शेतकर्‍यांना कंपोस्ट खत व रासायनिक खतांची विक्री करणार आहे.

 

 

शेतकर्‍यांनी ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब केल्यास पाणी बचत होईल. ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब करण्यास इच्छुक शेतकर्‍यांना कारखाना मार्गदर्शन व सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तालुक्यात व कारखाना कार्यक्षेत्रात बर्‍यापैकी पाऊस झालेला आहे. शिवाय पुन्हा लवकरच पाऊस होण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे सभासद, शेतकर्‍यांनी ऊस लागवड सुरू करावी.शेतकर्‍यांच्या ऊस नोंदी 10 जूनपासून कारखान्याच्या शेतकी विभागात घेतल्या जातील. शेतकरी, सभासदांनी ऊस लागवडीच्या नोंदी द्याव्यात, असे आवाहन नाईक व शेतकी अधिकारी शशिकांत आंधळकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*