नगर- कल्याण महामार्गावर लवकरच दोन ठिकाणी टोलनाका

0

वाहनचालकांच्या खिशाला झळ; ढोकी व डुंबरवाडीत टोलउभारणी

 

पारनेर (प्रतिनिधी) – एकीकडे राज्य सरकारने टोलमुक्त महाराष्ट्राचे धोरण अवलंबिले असताना दुसरीकडे नगर- कल्याण राष्ट्रीय महामार्गावर (61) वर लवकरच टोलवसुली सुरू केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. तर या टोलवसुलीला स्थानिक पातळीवर विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून खाजगी तत्वावर ही टोलवसुली देण्यात येणार आहे.

 
तर दुसरीकडे केंद्र सरकारने या नगर- कल्याण राष्ट्रीय महामार्गासाठी 200 कोटी रूपयांच्या वर खर्च केला असून नगर बायपास पासून ते माळशेज घाटापर्यतचे रस्ता रूंदीकरण व मजबुतीकरणाचे काम अशोका बिल्डकॉन या कंपनीला देण्यात आले होते.या कंपनीच्या वतीने करण्यात आलेले हे काम अंतिम टप्प्यात आहे. पारनेर तालुक्यातील ढोकी हद्दीतील काळु पुलाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने टोलनाका टोलउभारणी काम लवकरच चालू केले जाणार आहे. तर दुसरीकडे याच नगर कल्याण महामार्गवर जुन्नर तालुक्यातील ओतुरजवळ असणारा डुंबरवाडीत टोलउभारणी करण्यात आली असून टाकळी ढोकेश्वर जवळच असणारा व ढोकी हद्दीत काळु पुलाजवळच हा दुसरा टोल उभारला जाणार आहे.

 
या महामार्गावरील काम अंतिम टप्पात असुन हा राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारच्या ताब्यात लवकरच ठेकेदार आहे. त्यानंतर या महामार्गावरील टोलवसुली साठी लवकरच निविदा काढण्यात येणार असून सर्वात जास्त बोली लावणारास या महामार्गावरील टोलवसुलीचे काम देण्यात येणार आहे. यासाठी नगर येथील एका स्थानिक आमदाराने फिल्डिंग पण लावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 
तर याच नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ठेकेदाराकडून अनेक छोटी मोठी कामे प्रलंबित असुन बाह्यवळणाची कामे बाकी आहेत.तसेच अनेक गावे व या महामार्गाला जोडणारा गावांसबंधी कोणताही दिशादर्शक फलक पण लावण्यात आलेला नाही. तसेच या महामार्गावर प्रवाशांसाठी शौचालय व मुतारी पण कोठे बांधण्यात आली नाही.

 

त्यामुळे प्रवाशांना प्रमुख सुविधा या महामार्गावर उपलब्ध करून देणे ठेकेदारांना बंधनकारक आहे.तर डुंबरवाडी टोलनाका टोलवसुली काम पूर्ण झाले असून ढोकीजवळील टोलवसुली काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे नव्या शासकीय धोरणानुसार किलोमीटर नुसार टोलआकारणी की वाहनांनुसार टोल आकारणी केली जाते याकडेही वाहनचालकांसह स्थानिक रहिवासियांचे लक्ष लागले आहे. तर या अगोदर पण याच महामार्गावर नेप्ती पुलाजवळ बरीच वर्षे अवैध टोलवसुली केली जात होती.

 

टोलवसुलीला ब्रिगेडसह मनसेचा विरोध
नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग अनेक दिवसांपासून प्रलंबित रस्ता होता. या रस्त्यांचे काम आता पुर्ण होणार असून टोलवसुलीचे धोरण केंद्र व राज्य सरकारने अवलंबिले आहे. परंतु या महामार्गावरील टोलवसुली संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठुबे व तालुकाध्यक्ष स्वप्निल ठुबे व मनसेचे तालुकाध्यक्ष अश्पाक हवालदार यांनी विरोध केला असून यासाठी जनआंदोलन उभारण्याच्या पावित्र्यात आहे. एकीकडे अपुरे काम तर दुसरीकडे सुविधांचा अभाव अशी अवस्था या महामार्गावर असून टोलवसुली सुरू करू नये अशी मागणी संभाजी ब्रिगेड व मनसेने केली आहे.

LEAVE A REPLY

*