नगरमध्ये 22 लाखांची तूर पकडली!

0

पोलिस म्हणतात चौकशी सुरू, ढाकणे म्हणतात मालकाने चार दिवस ट्रक लपवून ठेवल्या

अहमदनगर (प्रतिनिधी) -एमआयडीसी भागात नागापूर परिसारात बुधवारी पहाटे एकच्या सुमारास रस्त्याच्या कडेला संशयास्पद उभ्या असलेल्या दोन तुरीच्या ट्रका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून ताब्यात घेतल्या आहेत.
दोन्ही ट्रका पाथर्डी येथील असून त्या पुण्याला तूर घेऊन निघाल्या होत्या. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने नाफेडच्या अधिकार्‍यांना पत्र देऊन या ट्रक आणि त्यातील तूरीची तपासणी करून स्थानिक गुन्हे शाखेला अहवाल देण्याच्या सुचना केला आहेत. सुमारे 22 लाखांची ही तूर असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, याप्रकरणी पाथर्डी बाजार समितीत तूर खरेदीत कोणताही घोटाळा झालेला नाही. ज्या ट्रकमधून तूर पुण्याला पाठवण्यात आली होती, त्या ट्रकच्या मालकाने पैशासाठी चार दिवस या नगर ट्रक लपवून ठेवला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांनी बुधवारी नगरमध्ये पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे हे प्रकरण आता काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बुधवारी पहाटे एकच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागापूर परिसारात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना रस्त्याच्याकडेला दोन ट्रक संशयास्पद उभ्या असल्याच्या दिसल्या. रहदारीच्यादृष्टीने पोलीसांनी चालकांकडे ट्रकबाबत विचारणा केली. तसेच ट्रकची कागदपत्रे आणि त्यात काय आहे, याबाबत विचारले. मात्र, ट्रक चालकांना समर्पक उत्त्तरे देता आली नाहीत. यासह ट्रकमध्ये असणार्‍या तूरी संदर्भातील कोणतचे कागदपत्रे चालकांकडे नव्हते.
या दोन ट्रक तूरीने भरलेल्या होत्या. ज्या बारदाण्यात ही तूर भरलेली होती, त्यावर नाफेड, पंजाब सरकार, स्वच्छ भारतचा लोगो आहे. पण चालकांकडे कागदपत्रे नसल्याने पोलीसांनी या ट्रक चौकशीसाठी ताब्यात घेत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या केल्या. बुधवारी सकाळी कागदपत्रे आणण्याच्या सुचना ट्रक चालकांना दिल्या. त्यानूसार चालकांनी बुधवारी सकाळी ट्रकची कागदपत्रे आणि तूरची संदर्भातील कागदपत्रे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांना सादर केली. मात्र, पोलीसांना सादर केलेल्या कागदपत्रामध्ये तफावत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने नाफेडच्या अधिकार्‍यांना पत्र देऊन या ट्रक आणि त्यातील तूरीच्या संदर्भात वस्तूनिष्ठ अहवाल पोलीसांना देण्याच्या सुचना केला. नाफेडचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गोरडे यांनी सार्वमत शी बोलतांना दिली.
पोलीसांनी पकडलेली तूरच्या ट्रका या पाथर्डी येथील आहेत. मात्र, यातील तूर शेतकर्‍याची, व्यापार्‍याची की पाथर्डी बाजार समितीचे याचे गौडबंगाल कायम आहे. यामुळे या प्रकरणातील गुंतावाढला आहे. यासह पाथर्डी येथून मिळालेल्या माहितीनूसार या ट्रक नगर-पाथर्डी रोडवर पकडण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात गुन्हा शाखेच्या पोलीसांनी मात्र या ट्रका नागापूर परिसारात पकडल्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
पाथर्डी तूर खरेदीत कोणताही
घोटाळा नाही : अ‍ॅड. ढाकणे
पाथर्डी बाजार समितीत तूर खरेदीत कोणताही घोटाळा झालेला नाही. ज्या ट्रकमधून तूर पुण्याला पाठवण्यात आली होती, त्या ट्रकच्या मालकाने पैशासाठी चार दिवस या ट्रक लपवून ठेवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांनी बुधवारी नगरमध्ये पत्रकार परिषदेत केला.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव केंद्रातून गेल्या 28 एप्रिल रोजी चार ट्रक शेतकर्‍यांची तूर खरेदी करून ती पुणे येथील नाफेडच्या भोसरी येथील वेअर हाऊसमध्ये पाठवण्यात आली होती. यासाठी साई ट्रान्स्पोर्ट आणि गणेश ट्रान्स्पोर्टकडून प्रत्येक दोन ट्रक घेण्यात आल्या होत्या. यातील साई ट्रान्स्पोर्टच्या ट्रक या विष्णू ढाकणे यांच्या मालकीच्या असून गणेश ट्रान्स्पोर्ट हे पाथर्डी येथील शेख नावाच्या व्यक्तीचे आहे. 28 तारखेला निघालेल्या चार पैकी गणेश ट्रान्स्पोर्टच्या दोन ट्रक पुण्याला पोहोचल्या. मात्र, साई ट्रान्स्पोर्टच्या ट्रक पुण्याला पोहचल्या नाहीत.
दोन दिवस वाट पाहूनही ट्रक पुण्याला न पोहोचल्याने साई ट्रान्स्पोर्टचे मालक ढाकणे यांच्याकडे विचारणा केली असता पुण्याला पाठवण्यात आलेली तूर ही शेतकर्‍यांची नसून व्यापार्‍यांची आहे. शेतकर्‍यांच्या नावाखाली व्यापार्‍यांची तूर पाठविण्यात येत आहे. तिसगाव येथील तूर खरेदी केंद्र बोगस आहे. दोन गाड्या तूर पुण्याला पाठवयाची असल्यास 15 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा पुण्याला ट्रक पाठवणार नाही, असे त्यांनी सांगितले. अखेर बाजार समितीच्या सर्व संचालकांनी बुधवारी सकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी साधा तक्रार अर्ज नोंदवून घेतला. तसेच तुमच्या ट्रक नगरच्या एलसीबी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती दिली.
साई ट्रान्स्पोर्टचे मालक ढाकणे यांना तिसगाव केंद्रातील तूर व्यापार्‍यांची आहे असे वाटत होते तर त्यांनी चार दिवस कशासाठी वाट पाहिली? आता पोलिसांना हाताशी धरून पाथर्डीत तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा बनाव विष्णू ढाकणे करत असल्याचा आरोप अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी केला आहे. पाथर्डी बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.

 

  मिळालेल्या माहितीनूसार या दोन ट्रक नाफेडच्या पुणे येथील वेअर हाऊसमध्ये तुरीचा साठा करण्यासाठी पाथर्डीहून पुण्याकडे निघाल्या होत्या. मात्र, त्या रस्ता सोडून एमआयडीसी भागात कशासाठी पोहचल्या असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गुन्हा शाखेचे पोलीसांना कागदपत्रामध्ये तफावत आढळल्याने पोलीसांनी नाफेडच्या अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात नाफेडच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी मगरे यांच्याशी संपर्क साधला असता दोन ट्रक तूर गुन्हा शाखेचे पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याचे पत्र नाफेडला प्राप्त झाले आहे. सदर तूर नाफेडची असून त्या ट्रक पुण्याला जात असतांना ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी पाथर्डी बाजार समितीला पत्र दिले असून, गुरूवारी याबाबत माहिती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*