नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरूंग स्फोटात एक जवान शहीद : कोपरगावच्या कान्हेगावचे पोलीस निरीक्षक सांगळे बालंबाल बचावले

0
गडचिरोली – गडचिरोलीतील भामरागडमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरूंग स्फोटात 12 पोलीस जखमी झाले. तर एक जवान शहीद झाला आहे. जवान पोलीस वाहनातून जात असताना भूसुरूंगाचा स्फोट झाला. या हल्ल्यात सुरेश तलामी हा जवान शहीद झाला आहे.
छत्तीसगडमधील सुकमामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सुकमा येथील हल्ल्यानंतर काही दिवसांतच विदर्भात घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला होता. मात्र, बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये काल चकमक झाली होती. त्याचाच बदला म्हणून नक्षलवाद्यांनी कमांडोंची गाडी उडवली.
सी-60 कमांडोंचे पथक गस्तीवर असतानाच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने त्यांची बुलेटप्रूफ गाडी उडवली. यामध्ये सुरेश तेलामी शहीद झाले. सुरेश तेलामी हे भामरागड तालुक्यातील कृष्णार गावचे रहिवासी होते. तर या स्फोटात 12 जवान जखमी झाले. सी-60 फोर्स हे महाराष्ट्र पोलिसांचे नक्षलवादविरोधी विशेष दल आहे. या हल्ल्यातील जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

नक्षलवाद्यांनो, नेत्यांना ठार मारा : यादवे
पाटना – सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात 25 जवान शहीद झाल्याच्या घटनेचा निषेध करताना जनअधिकार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार पप्पू यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नक्षलवाद्यांनो, जवानांवर हल्ला करून त्यांना ठार का मारता. मारायचेच असेल तर ही व्यवस्था चालविणार्‍या नेत्यांना ठार मारा,असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे. यादव यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

सांगळेंचे कुटुंब कान्हेगावात…
कान्हेगाव (वार्ताहर)- भामरागड तालुक्यातील जंगलात नक्षली हल्ल्यात जखमी झालेल्या तीन जवानांना आणण्यासाठी निमलष्करी दलाची बुलेटप्रूफ गाडी रस्त्याने येत असतानाच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने ती उडवली. ती दहा-बारा फूट उंच उडून खाली कोसळल्यावर चारपाच पलट्या खाल्ल्या. यात एक जवान शहीद झाला. 12 जण जखमी झाले.पण दैव बलवत्तर म्हणून याच गाडीत असलेले नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथील रहिवासी असलेले पो. नि.संजय सांगळे हे बालंबाल बचावले. त्यांच्यावर भामरागड येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांच्या बंधूकडून सांगण्यात आले. श्री. सांगळे हे गेल्या सव्वा दोन वर्षांपासून नक्षलवादी भागात आपली ड्युटी निभावत आहेत. त्यांची पत्नी, भाऊ व अन्य नातेवाईक कान्हेगावातच राहतात. दोन मुले असून शिक्षणानिमित्ताने ते नाशिक येथे आहेत. संजय सांगळे बचावल्याने ग्रामस्थांना हायसे वाटले आहे. 

LEAVE A REPLY

*