धुळ्यात लाचखोरांवर संक्रांत

0

धुळे । दि.2 । प्रतिनिधी

नायब तहसीलदारासह लिपीक गजाआड

 

शेतजमिन एन.ए. करण्यासाठी 15 हजार रूपयांची लाच मागीतल्याप्रकरणी नायब तहसीलदारासह लिपीकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील नायब तहसीलदार हे सध्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे कार्यरत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची जुनवणे गावाच्या शिवारात गट नं.55/2ब/1/अ मध्ये 2 हेक्टर 25 आर. शेतजमीन आहे. तक्रादारांनी सदर शेतजमीन बिनशेती (एन.ए.) होण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात 2015 मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.12 एप्रिल 2017 रोजी तहसीलदार यांच्या कार्यालयात जावून बिनशेती प्रकरणासंदर्भात नायब तहसिलदार श्री. गुरव यांना भेटून विचारणा केली. त्यावेळी त्यांनी तुमचा बिनशेती (एन.ए.) प्रयोजनाचा प्रस्ताव माझ्याकडे आहे, असे त्यांनी सांगीतले. त्यावेळी तक्रारदार यांनी प्रस्ताव शिफारशीसह लवकर पुढे पाठविण्याची विनंती केली.त्यावेळी माझा लिपीक प्रदीप यांना भेटून घ्या व ते सांगतील तसे करा, असे गुरव यांनी सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी लिपीक प्रदीप देवरे यांना भेटून कामासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी तुमचे शेतीच्या बिनशेती (एन.ए.) प्रयोजनाच्या प्रस्तावावर शिफारस करून पुढे पाठविण्यासाठी नायब तहसीलदार श्री.गुरव यांनी 15,000 रु. सांगितले आहे. परंतु तक्रारदार यांना नायब तहसीलदार श्री.गुरव व लिपीक प्रदीप देवरे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पंच साक्षीदार समक्ष पडताळणी केली असता नायब तहसीलदार हरीष बजरंग गुरव, लिपीक प्रदीप शरद देवरे यांनी तक्रारदार यांच्या बिनशेती (एन.ए.) प्रयोजनाचा प्रस्ताव शिफारशीसह पुढे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 15,000 रूपयांची लाच मागीतली. यासंदर्भात ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरुन लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द वरिष्ठांच्या आदेशान्वये दि.2 ऑगस्ट रोजी धुळे शहर पो.स्टे.येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरिक्षक महेश भोरटेक, पोलीस निरिक्षक पवन पी.देसले व त्यांच्या पथकातील पोहेकॉ जितेंद्रसिंग परदेशी, पोना/कैलास शिरसाठ, सतीष जावरे, कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, देवेंद्र वेन्दे, मनोहर ठाकुर, प्रकाश सोनार, पोकॉ प्रशांत चौधरी, संदीप सरग, संतोष हिरे, संदीप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

हिरे मेडिकलचा लिपीक जाळ्यात


तीन हजाराची लाच घेताना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय तपासणी मंडळाच्या लिपीकाला रंगेहाथ पकडण्यात आले. जळगावच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पोलिस दलातील बिनतारी संदेश विभागात सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत आहेत. कमरेच्या आजारापणामुळे तक्रारदार वैद्यकीय रजेवर गेले होते. रजेवरुन हजर होण्याकरिता गेले असता त्यांनी तक्रारदार यांना रजेचा कालावधी वैध ठरविण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र तपासणीसाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय अधिकारी मंडळ यांच्याकडे पाठविले होते. त्यानुसार तक्रारदार दोन दिवस वैद्यकीय तपासणी मंडळ, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे गेले. सर्व वैद्यकीय तपासण्या करुन घेतल्या होत्या. त्यानंतर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरीष्ठ लिपीक श्री.फुलपगारे यांनी तक्रारदाराची वैद्यकीय तपासणी विनाअडथळा पुर्ण करुन त्या संदर्भातील फिजिकल फिट असल्याचे अंतिम प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच वैद्यकीय मंडळाच्या सदस्यांची अंतिम प्रमाणपत्रावर सही झाल्यानंतर त्या प्रमाणपत्राचा गोपनीय बंद लिफाफा तक्रारदार यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठविण्यासाठी दि. 6 जुलै 2017 रोजी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार यांनी वरीष्ठ लिपिक श्री. फुलपगारे यांना दोन हजार रुपये दिलेले होते. त्यावेळी वरिष्ठ लिपीक श्री. फुलपगारे यांनी उर्वरीत तीन हजार रुपये दिल्यानंतर फिजिकल फिट असल्याचे अंतिम प्रमाणपत्र देईल, असे तक्रारदार यांना सांगितले होते. त्यावरुन तक्रारदार यांनी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, जळगाव यांच्याकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची आज दि. 2 ऑगष्ट 2017 रोजी लाच मागणी पडताळणी करुन अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जळगाव पथकाने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे सापळा लावला. वरीष्ठ लिपिक श्री. फुलपगारे यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्याविरुध्द धुळे शहर पोलिस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 7,13(1)(ड) सह 13 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, जळगावचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

पोलीस निरिक्षक देविदास भोज निलंबीत

तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच स्विकारतांना शिंदखेडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक देविदास रघुनाथ भोज यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर भोज यांना अटक करण्यात येऊन पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज पोलिस विभागाने भोज यांना निलंबीत करण्याचा आदेश काढला आहे.
शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक देविदास भोज यांना दि. 26 जुलै 2017 रोजी तक्रारदाराकडून 1500 रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानुसार भोज यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज आय.जी. यांनी देविदास भोज यांना निलंबीत करण्याचे आदेश काढल्याची माहीती पोलिस सुत्रांनी दिली.

 

 

 

LEAVE A REPLY

*