धाडसत्रात 800 टमरेल जप्त; उघड्यावर शौच्यास बसणार्‍यांवर कारवाई

0

मालेगाव । दि. 6 प्रतिनिधी – येथील पंचायत समितीतर्फे स्वच्छ भारत अभियान व हागणदारीमुक्त गाव योजना यशस्वी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या टमरेलमुक्ती मोहिमेंतर्गत गुडमार्निंग पथकांनी तालुक्यातील 60 गावांमध्ये धाडी टाकून आठशेहून अधिक टमरेल जप्त केले.

आज भल्या पहाटे झालेल्या या कारवाईने ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्य शासनाने आज पंचायत समित्यांना गावोगावी टमरेलमुक्त मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पं.स. गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी-कर्मचार्‍यांची दहा पथके कार्यान्वित करण्यात आली होती.

पाच ते सहा जणांचा समावेश असलेल्या या पथकांनी पहाटे 5.30 पासून मोहीम राबविण्यास प्रारंभ करत ठिकठिकाणी धाडी टाकून उघड्यावर शौच्यास बसलेल्यांचे टमरेल जप्त केले.

निमगाव, मांजरे, शिरसोंडी, सावकारवाडी, गुगुळवाड, टाकळी, सोनज, चिंचगव्हाण, उंबरदे, माल्हणगाव, खायदे, गिलाणे, येसगाव, मथुरपाडे, चंदनपुरी, मळगाव, डोंगराळे, वनपट, चिंचवे, कौळाणे, ज्वार्डी, मेहुणे, अस्ताणे, जळकू, टोकडे, मोहपाडा आदी 60 गावांमध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत पथकांनी 800 हून अधिक टमरेल जप्त करत ग्रामस्थांना शौच्यालय बांधून गाव हागणदारीमुक्त करण्याबाबत प्रबोधन केले.

मोहिमेसाठी स्थानिक पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक तलाठी, आशा स्वयंसेवकांचेही सहकार्य घेण्यात आल्याचे गटविकास अधिकारी श्री. पिंगळे यांनी दै.‘देशदूत’शी बोलताना सांगितले.
तालुक्यातील 34 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून 50 टक्के योजना यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे.

येत्या मार्चअखेर 100 टक्के उद्दीष्टपुर्तीचा संकल्प असल्याचे गटविकास अधिकारी श्री. पिंगळे यांनी नमूद केले. एप्रिल 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत 1288 शौच्यालयांचे बांधकाम पुर्ण झाले असून ते वापरात आहेत.

उर्वरित ग्रामस्थांना शौच्यालय बांधण्यासाठी शासन यंत्रणेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असून ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवून योजना यशस्वी करावी, त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही जनजागृती करावी, असे आवाहन श्री. पिंगळे यांनी केले आहे.

सर्वांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी उघड्यावर शौच्यास न बसता शौच्यालय निर्मिती करणे आवश्यक असून जागा उपलब्ध असूनही शौच्यालय न बांधणार्‍या तसेच शौच्यालय असून ते न वापरणार्‍या ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करत 1200 रूपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही श्री. पिंगळे यांनी शेवटी बोलताना दिला.

LEAVE A REPLY

*