देवठाण येथे वीज व पाणी प्रश्नी तीन तास रास्ता रोको

0

अकोले ( प्रतिनिधी) – वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ व वाड्या वस्त्यांना टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरवावे या मागणी साठी पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके यांच्या नेतृत्वाखाली अकोले ते सिन्नर रस्त्यावर देवठाण येथे काल शुक्रवारी सकाळी सुमारे तीन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 
वीज व पाणी प्रश्नी काल शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता देवठाण येथे ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी रस्ता रोको केला. यावेळी समशेरपूर उपकेंद्रात 33 बाय 11 के . व्ही . उपकेंद्रात 5 एम व्ही ए चा मंजूर ट्रान्सफोर्मार बसविण्यात यावा, जुनाट झालेल्या विदूत वाहकाच्या तारा बदलण्यात याव्यात, देवठाण स्ट्रीट लाईटचा तातडीने सर्वे करून अंदाज पत्रक देण्यात यावे. तसेच पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, मंजूर असलेले समांतर ट्रान्सफोर्मार त्वरित बसवण्यात यावे, देवठाण येथील कटवलवाडी, तवेमळा, शिंगाडे वस्ती, गणेश खिंड, भैरवनाथ नगर दत्त मंदिर परिसर या ठिकाणी स्ट्रेट लाईट चे पोल बसवण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. त्याच प्रमाणे पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित पाण्याची व्यवस्था करावी गिरेहेवाडी, गांगड वाडी , पथवे वस्ती , माशेरे वस्ती व उघडे वस्ती आदि ठिकाणी त्वरित पाण्याचा पुरवठा करावा आदी मागण्या करण्यात आल्या.

 
यावेळी बोलताना पं. स.चे माजी सदस्य अरुण शेळके म्हणाले , मागील वर्षी समशेरपूर उपकेंद्रासाठी 33 बाय 11 केव्ही 5 एमव्हीएचा ट्रान्सफोर्मार मंजूर केला होता. मात्र वर्षाचा कालावधी उलडून गेला तरी कंपनीने हा ट्रान्सफार्मर बसविला नाही. त्यामुळे देवठाण गावाला कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.परिसरातील शेतकरी अवकाळी पावसाने व गारपिटीने आधीच मेटाकुटीस आला आहे. शेतकर्‍यांचे विद्यूत पंप जळण्याचे प्रमाण वाढले असून पाण्याअभावी पिके जाळून जात आहे . त्यामुळे शेतकरी त्रासले आहे. अधिकारी शेतकर्‍यांंना दम देतात, या पुढे दादागिरीची भाषा खपवून घेणार नाही. शेतमाला चे नुकसान झाल्यास त्याला महावितरण कंपनी जबाबदार आहे त्यांच्या विरोधात प्रसंगी न्यायालयात जाऊ, पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव दीड महिना झाला तरी तो अधिकार्यांना सापडत नाही हि शोकांतिका आहे अधिकार्यांनी लेखी आश्वासन दिल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 
यावेळी माजी सरपंच एकनाथ शेळके, रमेश बोडके, देखरेख संघाचे माजी अध्यक्ष मोहन शेळके, देवठाण सोसायटी चे संचालक सूर्यभान सहाने, सुभाष सहाणे, भारत सहाणे, भिकाजी जोरवर, रामनाथ पथवे आदींचे भाषणे झाली. समशेरपूर चे शाखा अभियंता काकड यांनी त्वरित ट्रान्सफार्मर बसून देऊ असे लेखी आश्वासन दिले. तर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक इरनक यांनी लेखी आश्वासन दिले. त्यानुसार देवठाण येथील वाड्यांना तातडीने टँकर ने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

 
यावेळी आंदोलकांच्या वतीने नायब तहसीलदार जगदीश गाडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक इरनक यांना निवेदन देण्यात आले . पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोवस्त ठेवला होता . यावेळी मोठ्या संख्येने महिला हंडे घेऊन उपस्थित होत्या. तसेच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

 

 

LEAVE A REPLY

*