दारणातून पाणी!

0

7 मे रोजी गोदावरीच्या कालव्यांना पाणी सुटणार

राहाता, अस्तगाव (वार्ताहर) – गोदावरी कालव्यांवरील पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी दारणा धरणातून काल बुधवार 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता 1100 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. 7 मे रोजी गोदावरी च्या दोन्ही कालव्यांना पाणी सुटणार आहे.

 
राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नाशिक येथे महसूल आयुक्त कार्यालयात अधिकारी पातळीवर बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. ना. विखे पाटील यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला आयुक्त एकनाथ डवले, नाशिक तसेच नगरचे जिल्हाधिकारी, जलसंपदाचे मुख्य अभियंता श्री. वाघमारे, अधीक्षक अभियंता मोरे, कार्यकारी अभियंता आर. के. शिंदे, कोपरगाव विभागाचे उपअभियंता भास्कर सुरळे, राहाता उपविभागाचे संजय कासनगुट्टुवार,यांचेसह वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

 
या बैठकीत संपूर्ण आढावा घेऊन दारणा धरणातून बुधवारी सायंकाळी 1100 क्युसेक ने पाणी सोडण्यात आले. हे पाणी दोन दिवसांत खाली नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात पोहचेल. तेथून लेव्हल आल्यानंतर साधरणत: 7 मे रोजी दिवसभरात गोदावरी च्या उजव्या तसेच डाव्या कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी डाव्या कालव्याद्वारे कोपरगाव परिसरात 9 मे रोजी तर उजव्या कालव्याद्वारे राहाता तालुक्यात 10 मे रोजी पोहचणार आहे. सुरुवातीला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी देण्यात येणार आहे. सर्व पाणी योजनांचे तलाव भरल्यानंतर सिंचन सुरू होणार आहे.

 

टेल टू हेड सिंचन!
उजव्या कालव्यावर 1600 हेक्टर तर डाव्या कालव्यावर 1100 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. एकूण 2700 हेक्टरला पाणी देण्यात येणार आहे. कालव्यावरून हेड टू टेल असे तर वितरिकांना हेड टू टेल असे पाणी देण्यात येणार आहे. या आवर्तनातून उफाड्याचे क्षेत्र वगळता जास्तीतजास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा जलसंपदाचा प्रयत्न असणार आहेे.

शेतकरी या आवर्तनाची चातकासारखी वाट पाहत आहेत. हे आवर्तन यापूर्वीच घ्यायला हवे होते असा शेतकर्‍यांचा सूर होता. 10 मे रोजी कालव्यांना पाणी सोडण्यात येणार होते; परंतु विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रेट्यामुळे हे पाणी तीन दिवस आगोदर सोडण्यात येत आहे.
दरम्यान कालव्यांवर विविध कामे सुरू असल्याने सुरुवातीला फक्त दारणातील पाणी या आवर्तनासाठी सोडण्यात येणार आहे. नंतर समूहातील इतर धरणांचे पाणी या आवर्तनाला वापरण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*