दहावीच्या परिक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

जळगाव । दि.13। प्रतिनिधी-दहावीच्या विद्यार्थ्याने दोन विषयात नापास झाल्याने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना दुपारी 1.30 नांद्रा येथे घडली.
याप्रकरणी तालुका पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दहावी परिक्षेचा मंगळवारी दुपारी ऑनलाईन निकाल जाहीर झाला. दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्याचे मित्र गावातील एका रसवंतीजवळ बसलेले होते.
तेथे चेतन गणेश पाटील (वय 16) हा देखील होता. सर्वांनी मोबाईलवर ऑनलाईन निकाल पाहिला. नांद्रा येथील शाळेतील अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर चेतन हा इंग्रजी व गणित विषयात नापास झाल्याचे त्याला समजले.
निकाल पाहिल्यानंतर चेतन हा मित्रांजवळून उठून थेट घरी गेला. वडील जळगावात कामानिमित्त तर आई लहान भाऊ बंटी याला घेण्यासाठी धुळे येथे गेलेली होती, त्यामुळे घरी कोणीच नव्हते.

घरात साडीच्या कपड्याने त्याने गळफास घेतला. सोबत असलेला एक मित्र त्याला लागलीच पाहण्यासाठी आला असता घराचा दरवाजा उघडा होता. तर चेतन याने गळफास घेतला होता त्या मित्राने त्याला तत्काळ खाली उतरविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्याकडून शक्य न झाल्याने त्याने साडी तोडली परंतुतीही अर्धवटच तुटली.

त्याने अन्य मित्रांना बोलावून त्याला खाली उतरविले. पायाला झटके येत असल्याने गावातील डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आले. त्यांनी त्याची तपासणी करुन जळगावला नेण्याचा सल्ला दिला.

जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडीलांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

LEAVE A REPLY

*