थकीत कर्ज पुनर्गठणाचा प्रस्ताव अडला जिल्हा बँकेत

0

कर्डिले, सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या मेळावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरीच्या डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्गठणाचा प्रस्ताव जिल्हा बँकेत अडला आहे. यामुळे कारखाना सुरू करण्यास अडचण झाली आहे. कारखान्यांच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी उद्या कारखानास्थळावर सभासद-कामगार यांच्या मेळावा बोलावण्यात आला आहे. आमदार शिवाजी कर्डिल यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या मेळाव्यास युवा नेते सुजय विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात कारखान्यांच्या भविष्यावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी दिली. डॉ. तनपुरे साखर कारखान्यांकडे जिल्हा बँकेचे 88 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसूलीसाठी बँकेच्यावतीने कारखान्यांची मालमत्ता सेक्युरिटायझेशन कायद्यान्वये जप्त करण्यात आली आहे. 24 एप्रिला महसूल खात्याचे अधिकारी आणि बँकेने प्राधिकृत केलेल्या अधिकार यांनी ही कारवाई पारपडली. दरम्यान, कारखान्याच्या कर्जाच्या पुनर्गठणाचा प्रस्ताव जिल्हा बँकेला सादर करण्यात आला. त्यानुसार गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक बोर्डाच्या बैठकीत या पुनर्गठणाच्या प्रस्तावावर चर्चाही झाली.
मात्र, कर्जाचे पुनर्गठण करण्याआधी कारखान्यांची यंत्र सामुग्री सुस्थितीत आहे की नाही. या यंत्र सामुग्रीवर कारखाना पुन्हा चालू शकतो की नाही याची तपासणीचा निर्णय घेण्यात आला. तपासणी अहवालानुसार कारखाना पुन्हा सुरू होवू शकतो की नाही यावर कर्जाच्या पुर्नगठणावर निर्णय घेण्याचे ठरले. यामुळे कारखान्यांच्या पुनर्गठणात पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. कारखान्यांचे हजारो सभासद आणि कामगारांचे भविष्य पुन्हा अंधारात गेले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी कारखान्यांची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्याचा मेळावा बोलवण्यात आला आहे. मेळाव्यात कारखान्यांच्या भविष्यावर निर्णय होणार असल्याचे यावेळी अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
राहुरी तालुक्याच्या अर्थकाराणाचा केंद्रबिंदू असणार्‍या आणि हजारो लोकांच्या प्रपंचाचे साधन असणार्‍या तनपुरे कारखान्यांवर अव्यस्थापनामुळे कोट्यावधी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहीला आहे. यामुळे कारखान्यांचे सुमारे 1 हजार कामागर आणि 26 हजारांच्या जवळपास असणार्‍या सभासदांवर वाईट वेळ आली आहे. हा कारखाना वाचला तर या हजारो कुटूंबाचा उदरनिर्वाह चालणार आहे. यासाठी कारखाना पुन्हा सुरळीत सुरू व्हावा, अशी तालुक्यातील जनतेची मागणी असून यासाठी जिल्हा बँकेने सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

*