‘त्या’ शेतकर्‍याची सहकारमंत्र्यांबरोबर बैठक

0
अकोले(प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील मन्याळे येथील शेतकरी भैरवनाथ जाधव यांच्या कर्जप्रकरणी शिष्टमंडळाची सहकारमंत्री ना.सुभाष देशमुख यांच्याबरोबर काल मंगळवारी बैठक झाली. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी पतसंस्थेने समन्वय करून शेतकरी व पतसंस्था जगली पाहिजे असा मार्ग काढण्याचे आदेश दिले. पतसंस्थेने कर्ज देतानाच्या त्रुटी देशमुख यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. शेतकरी यांनी मला पूर्ण कर्ज मिळाले नाही त्यामुळे मी घरासाठी जे कर्ज घेतले ते पूर्ण झाले नाही तसेच पाच , सात वर्षांपासून पीकपाणी नसल्याने मी कर्जबाजारी झालो असून आत्महत्या शिवाय पर्याय नाही असे सांगितले. पतसंस्थेचे चेअरमन व संचालक यांनी जर कर्ज माफ केले तर ठेवीदार ठेवी ठेवणार नाहीत, पतसंस्थेचे दुसरे कर्जदार कर्ज भरणार नाहीत असे सांगितले.
कर्जदार यांना कर्ज देताना पतसंस्थेच्या त्रुटी निदर्शनास आल्या असल्यामुळे काही ठराविक रक्कम भरून शेतकर्‍याला न्याय देण्याची भूमिका सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांना भाजपचे शेतकरी नेते पाशा पटेल यांनी पटवून दिली. भैरवनाथ जाधव यांनी विहिरीमध्ये सात दिवस उपोषण केले होते खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिष्टाई करीत हे उपोषण मागे घ्यावयास लावले होते. यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल, शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, भाजप तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मन्याळेचे सरपंच अमित कुर्‍हाडे, शिवसेना शाखाप्रमुख गजानन हांडे, यशोमंदिर पतसंस्थेचे चेअरमन अशोक वाळुंज, संचालक दिनेशचंद्र हुळवले, जिजाभाऊ मते, भीमाजी आरोटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*