तोफखान्यातील जुगार अड्ड्यांवर छापा

0

केडगाव, भिंगार, सावेडी, सर्जेपुरातील 13 अटकेत: सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवस्तीतही जुगारअड्डे अजून सुरू असल्याची बाब आता समोर आली आहे. तोफखाना भागातील जंगुभाई तालीम येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 17 जुगार्‍यांविरुध्द कारवाई केली आहे. हा जुगार अड्डा राजूमामा जाधव, भैय्या परदेशी, ननु दैंडकर, आप्पा बांगर चालवित असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने रविवारी रात्री हा छापा टाकला.
छाप्यात 13 जणांना अटक करण्यात आली असून राजू जाधव याच्यासह चौघे पसार झाले आहेत. जुगार खेळणार्‍यांकडून सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलराम परशुराम भगत (रा. कापुरवाडी), कुमार रामभाऊ कचरे (रा. भुतकरवाडी), सन्मित्र गिरीष शिंबेकर (रा. माणिकचौक), विजय परशुराम बोरूडे (रा. बोरूडेमळा), दिनेश ठकण कापसे (रा. सारसनगर), बापु चंद्रकांत शेळके (रा. नालेगाव), बाळु रमेश कोकम (रा. पाईपलाईन रोड), शहानवाज लियाकत शेख (रा. कोठला), मोहसिन नाज महंमद शेख (रा. झेंडीगेट), कृष्णा आसाराम बोरूडे (रा. सुर्यानगर), समीर अब्दुल शेख (रा. भिंगार), किशोर काशिनाथ खोलम (रा. केडगाव), मुरली विश्‍वनाथ कोडम (रा, सर्जेपुरा) अशी अटक केलेल्या 13 जुगार्‍यांची नावे आहेत. भैय्या परदेशी, राजु मामा जाधव, ननु दैंडकर, आप्पा बांगर हे चौघे पसार झाले आहेत.
रविवारी मध्यरात्री सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांना तोफखाना येथील जंगुभाई तालीम शेजारी जुगार सुरू असल्याचे खबर्‍याने कळविले. सिद्धी बागेच्या जवळच जंगुभाई तालीमच्या समोर एका खोलीत 10 ते 15 व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच शिंदे यांनी मुख्यालयातील काही कर्मचारी, विशेष सुरक्षा पथक व विभागीय कार्यालयातील कर्मचार्‍याचे पथक केले. मोठ्या फौजफाट्यासह शिंदे यांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलीस आल्याचे समजताच जुगार्‍यांची पळापळ सुरू झाली. मात्र शिंदे यांनी अगोदरच आजूबाजूला पोलीस ठेवल्यामुळे 13 जुगार्‍यांना सहज ताब्यात घेण्यात यश आले. रात्री उशिरा हा प्रकार घडल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. दुचाकी, मोबाईल, दिड लाखापेक्षा जास्त रोकड असा 3 लाख 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी फरारी असलेल्या चौघांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी गणेश रामदास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस करीत आहेत. रंगनाथ नरसाळे, सहायक फौजदार मंडलिक, सुयोग सुपेकर, बारवकर, मिसाळ, शेख, गणेश चव्हाण यांच्या पथकाने हा छापा टाकला.

LEAVE A REPLY

*