तळोदा क्रीडा संकुलाचे आज लोकार्पण

0
मोदलपाडा / तळोदा तालुक्यातील क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहत असलेल्या तालुका क्रीडासंकुल लोकार्पण सोहळा पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या हस्ते व खा.हिना गावित यांच्या उपस्थितीत तर आ.उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि.10 जून रोजी होत आहे.
जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, तसेच क्रीडायुवक सेवा संचालनालय नाशिक विभागाचे संचालक जयप्रकाश दुबळे, उपविभागीय अधिकारी तळोदा अमोल कांबळे, जिल्हाक्रीडाधिकारी घनःश्याम राठोड, कार्यकारी अभियंता अनिल पवार, तळोदा तहसीलदार योगेश चन्द्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.10 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे.
तळोदा तालुका क्रीडासंकुल हे बर्‍याच वर्षापासून प्रलंबित होते. आता मात्र हे क्रीडा संकुल पूर्णत्वास आले आहे. याबाबत नुकतीच तळोदा शासकीय विश्रामगृहात आ.उदेसिंग पाडवी यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली विविध सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली.

यात शहादा व तळोदा तालुका क्रीडा संकुलाच्या हस्तांतरण तसेच इतर महत्वपूर्ण विषयवार चर्चा झाली. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये उपजत क्रीडा कौशल्य, इच्छाशक्ती, जिद्द असते.

परंतु आधुनिक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे संधी मिळत नव्हती. आता मात्र लवकरच याच दालन क्रीडापटूसाठी उघडे होणार आहे. तळोदा तालुका क्रीडा संकुलाची इमारत बांधून तयार झाली आहे.

परंतु त्याचे क्रीडा संकुल प्रशासनाकडे हस्तांतरण न झाल्यामुळे, उर्वरित काम रखडलेले होते. यावेळी तालुका क्रीडा संकुल परिसर सपाटीकरण पुढील टप्प्यात होणार असून विविध मैदान तयार करण्यात येतील.

तळोद्यातील आय.टी.आय. कॉलेजशेजारी तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामास आ.उदेसिंग पाडवी यांनी क्रीडा संकुलाच्या निर्मितीकडे विशेष लक्ष दिले.

त्यांच्या प्रयत्नांतून क्रीडा संकुलाची इमारत उभी राहिली. त्यामुळे लवकरच क्रीडा संकुल तयार होवून त्याचा उपयोग खेळाडूंना घेता येईल अशी आशा खेळाडूंमध्ये व क्रीडा प्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.

संबंधित ठेकेदाराने अद्यापपावेतो संकुलाची इमारत क्रीडा संकुल प्रशासनाकडे हस्तांतरित केलेली नव्हती, त्यामुळे उर्वरित कामास विलंब होत होता.

इमारत हस्तांतरित झाल्यानंतरच क्रीडा संकुलाच्या इमारतीत बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ आदी खेळांचे तर परिसरात खो – खो, कबड्डी आदी खेळांसाठी आवश्यक असणारे साहित्य व त्यासाठी लागणारे मैदान तयार करता येणार आहे.

क्रीडा संकुलाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम झाल्यानंतर शहरातील व तालुक्यातील खेळाडूंना सरावासाठी आपल्या हक्काचे मैदान उपलब्ध होणार आहे आणि या सर्व खेळांना त्याद्वारे एकप्रकारे चालना मिळण्यास मदत होणार आहे.

क्रीडा संकुलामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे मैदान प्राप्त होईल. बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ यांसारख्या इनडोअर खेळांचा प्रसार व प्रचार होईल.

अस्सल ग्रामीण खेळ असलेले खो – खो, कबड्डी यांना चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*