टंचाई, अपव्यय आणि चोरीत अडकलाय पाणीप्रश्‍न

0
इंदिरानगर| दि. ११, प्रतिनिधी- एका बाजुला तीव्र पाणी टंचाई तर दुसर्‍या भागात पाण्याचा प्रचंड अपव्यय तर तिसर्‍या बाजुला होत असलेली पाण्याची चोरी या सर्व प्रकारांंचे मूळ मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी व नियोजनशून्य कारभारात असल्याचे वारंवार घडणार्‍या घटनांमधून सिद्ध होत आहे.
नवीन नाशिक व इंदिरानगर हे दोन्ही परिसर सख्खे शेजारी असूनही एका शेजार्‍याला तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत तर दुसर्‍या शेजार्‍याला प्रशासकीय गलथानपणामुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचे उघड्या डोळ्यांनी बघावे लागत आहे.

 

या परस्पर विरोधी दृष्यचित्रांच्या पार्श्‍वभूमीवर याच परिसरांचा जोडभाऊ असलेल्या वडाळागाव परिसरात स्थानिक रहिवाशी व भाडेकरुंकडून उघडपणे अनधिकृत नळजोडणी केली जात असूनही प्रशासनाच्या दिरंगाई व वेळकाढूपणामुळे अशा बेकायदेशीर पाणी वापरकर्त्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे कटू वास्तव उघडकीत आले आहे.
या प्रकारांमुळे महापालिकेचे अनेक प्रकारे नुकसान होत असून त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. मात्र त्यामुळे नियमित घरपट्टी व पाणीपट्टीसह मनपाचे कर भरणार्‍या नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे या अनधिकृत नळजोडणींवर उघड उघड पाण्याच्या मोारी बसवून पाणी खेचले जात आहे. थोडीफार घरपट्टी थकली तर कारवाईचा बडगा उगारणार्‍या महापालिका प्रशासनाची या ठिकाणी बोलती बंद का होते याचे उत्तर आजतायगत गुलदस्त्यातच आहे.
या प्रकारांच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून महापालिकेच्या संबंधित विभागांनी कठोर कारवाईची भूमिका घेऊन पाणीचोरीचे प्रकार रोखावेत व सुयोग्य नियोजन करून सर्व समान पाणी वाटपाचे धोरण राबविण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*