ज्ञानेश्‍वर, तुकोबांच्या पालखी सोहळ्याच्या धर्तीवर यापुढे निळोबारायांचीही पालखी

0

पारनेर (प्रतिनिधी) – संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम पालखी सोहळ्याच्या धर्तीवर संत परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळयाचे आयोजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय देहू येथील संत तुकाराम देवस्थान व पिंपळनेरच्या संत निळोबाराय देवस्थानच्या विश्‍वस्तांसह नगर व पुणे जिल्ह्यातील विविध दिंड्यांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपळनेर येथे पार पडलेल्या या बैठकीत पालखी सोहळ्याचा एकमताने निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

 
तालुक्यातील पिंपळनेर येथे संत निळोबाराय महाराजांचे संजिवन समाधी मंदीर असून दरवर्षी आषाढी वारीनिमित्त पिंपळनेर ते पंढरपूर या पायी दिंडीचे आयोजन करण्यात येत होते. तुकाराम महाराज यांचे शिष्य असलेल्या संत निळोबारायांचा पालखी सोहळाही संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्याप्रमाणे दिमाखदार असावा असा विचारप्रवाह गेल्या अनेक दिवसांपासून वारकारी सांप्रदायात होता. संत निळोबाराय देवस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी संस्थानच्या विश्‍वस्तांना बरोबर घेउन या विचार प्रवाहास मूर्त स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेतला. देवस्थानचे मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, देहू येथील संत तुकाराम देवस्थानचे विश्‍वस्त यांच्यासह नगर व पुणे जिल्ह्यातील दिंडी प्रमुखांशी चर्चा करून सर्वांचे एकमत झाल्यानंतर पिंपळनेर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 
संत निळोबारायांचा दिंडी सोहळा पालखी सोहळ्याच्या निमित्ताने नावारूपास येत आहे ही समाधानाची बाब असल्याचे सांगून यावेळी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पालखी सोहळ्यात शिस्त महत्वाची असून व्यसनाधिन व्यक्तींना सोहळ्यापासून दूर ठेवण्याचे आवाहन केले. जे व्यसन सोडू शकत नाहीत असे लोक इतर वाईट गोष्टी कशा सोडणार असा सवालही त्यांनी केला.

 
देहू संस्थानचे विश्‍वस्त माणीकराव मोरे म्हणाले, येत्या 5 ते 10 वर्षात संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या पालखी सोहळयाप्रमाणे संत निळोबाराय यांचा पालखी सोहळा लौकीक प्राप्त करील. दिंडीला जाताना आपल्या जाण्याचा समाजाला त्रास होणार नाही, आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सुनिल मोरे, शिवाजी मोरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. अशोक सावंत यांनी प्रास्ताविकात पालखी सोहळयासंदर्भात देवस्थानकडून देण्यात येणार असलेल्या सुविधा व सोहळा सुरू करण्यासाठी घेण्यात आलेल्या परिश्रमांची माहीती दिली.

 
संत परंपरेतील नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्‍वर, तुकाराम व निळोबाराय यांच्या वंशजांसह तुकाराम व ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थानचे विश्‍वस्त, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, भास्करगिरी महाराज तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 19 जून रोजी या पालखी सोहळयाचे पिंपळनेर येथून प्रस्थान होणार आहे.

 

तुकाराम महाराजांचा रथ निळोबारायांना!
तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात अनेक वर्षे वापरण्यात आलेला रथ संत निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी कायमस्वरूपी देण्याची घोषणा संत तुकाराम देवस्थानच्या वतीने या बैठकीत करण्यात आली. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयासाठी चांदीचा रथ तयार करण्यात आल्यानंतर सुस्थितीत असलेला पूर्वीचा रथ संत तुकाराम महाराजांच्या शिष्याच्या दिमतीला जात आहे ही भाग्याची गोष्ट असल्याच्या भावना संत तुकाराम देवस्थानच्या विश्‍वस्तांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

*