जीव वाचला हे महत्त्वाचे : युवराज

0
नवी दिल्ली । दि. 15 वृत्तसंस्था-भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना आज झाला. त्यात टीम इंडियाने बाजी मारली.
आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत पाकिस्तानविरुद्ध
खेळणार आहे.
बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आणखी एकदा चार हात करावेत, अशी स्वप्ने पाहण्यास क्रिकेट चाहत्यांनी सुरुवातदेखील केली आहे.
दरम्यान, हा सामना भारतीय संघासाठी जितका महत्त्वाचा होता तितकाच युवराजसिंगसाठीदेखील. या सामन्यासाठी मैदानात उतरल्यानंतर डावखुरा फलंदाज युवराजसिंग हा सचिन तेंडुलकर (463), राहुल द्रविड (344), मोहम्मद अझरुद्दीन (334) आणि सौरभ गांगुली (311) या दिग्गजांच्या पंक्तीत सामील होणार आहे. 300 एकदिवसीय सामने खेळण्याचा करिष्मा करणारा युवराज पाचवा भारतीय फलंदाज ठरेल.
क्रिकेट मैदानातील 17 वर्षांतील प्रवासाच्या यशाबद्द्ल सामन्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये युवराज म्हणाला, भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर पहिला सामनाच माझ्यासाठी खूप काही होता.
मी सर्व काही मिळवल्याची भावना मला त्या सामन्यात झाली. भारतीय संघासाठी मैदानात उतरलो तेव्हा माझे एक मोठे स्वप्नच पूर्ण झाले.

ते माझ्यासाठी खूप मोठे यश होते. त्यानंतर मी क्रिकेट कारकीर्दीतील 300 सामन्यांचा टप्पा पूर्ण करत आहे. हा प्रवास माझ्यासाठी खरेच फार मोठा आहे.

या प्रवासात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. यावेळी मी एवढ्यावर थांबणार नसून भारतीय संघासोबत अजून खूप खेळायचे आहे, असेही त्याने सांगितले.

युवराजसिंग हा सामना जिंकून देण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. तो आयुष्यातील भयंकर अशा कर्करोगावर मात करून दिमाखात पुन्हा मैदानात उतरला.

आजच्या घडीला त्याच्याकडे पाहिले तर त्याचा तोच जोश मैदानात दिसून येतो. त्यामुळे मोठ्या आजारातून मैदानात परतलेल्या युवराजची आणखी काही काळ भारतीय संघासाठी खेळण्याची त्याने व्यक्त केलेली इच्छा कदाचित क्रिकेट जाणकाराला अतिशयोक्ती नक्कीच वाटणार नाही.

 

LEAVE A REPLY

*