जीएसटीचे काउंटडाऊन, ऑफरमुळे बाजारात गर्दी

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– बहुचर्चित वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी आज मध्यरात्रीपासून म्हणजेच 1 जुलैपासून प्रत्यक्षात येणार आहे.

जीएसटी लागू होण्यापूर्वीच नगर बाजारपेठेत व्यावसायिकांनी अनेक ‘ऑफर’ जाहीर करत व्यावसाय करण्यास प्राधान्य दिले. ‘ऑफर’मुळे बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंच्या किंमती बदलणार आहेत. काही वस्तू अनपेक्षितरीत्या महाग होतील, तर काही स्वस्त होणार आहे. कोणत्या वस्तूवर किती कर लागेल हे आमजनतेला अजूनही माहिती नाही.

त्यामुळे नगरकरांना जीएसटीची उत्सुकता लागून आहे. सोन्याच्या दागिने खरेदी करताना जीएसटीमुळे एक टक्का करवाढ होणार आहे. त्यामुळे अनेकांनी आजच सोनेखरेदीला प्राधान्य दिल्याचे चित्र सराफ बाजारात दिसले.

जीएसटीनंतर रेडिमेड सोन्याचे दागिने स्वस्त होणार आहेत. मात्र, स्वतंत्ररित्या दागिने तयार करायचे असतील, ते महागणार आहेत.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये रात्री 11 वाजता जीएसटी लागू करण्यासाठी एक कार्यक्रम सुरु होणार आहे. रात्री 12 वाजून 10 मिनिटांपर्यंत सुरु राहणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. यानंतर 12 वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे देशात जीएसटी लागू झाल्याची घोषणा करतील.

स्वस्त काय?
बिस्किटे, चॉकलेट, केशतेल, साबण, टूथपेस्ट, टीव्ही, वॉशिंग मशिन, प्राथमिक स्मार्टफोन, सिमेंट, चहा, कॉफी, साखर, चित्रपट तिकिटे, नाटकाची तिकिटे, हॉटेलमधील खाणे, दुचाकी, प्राथमिक कार फर्निचर, खासगी टॅक्सी सेवा, दूध, धान्ये, भाज्या, फळे, आलिशान कार, मिठाई, झाडू, मेणबत्ती, सायकली,अ‍ॅल्युमिनियमची भांडी, तांब्याची भांडी, खते.

महाग काय?
मोबाइल बिल, आयुर्विमा पॉलिसी, बँकिंग सेवा, गुंतवणूक व्यवस्थापन सेवा, वाय-फाय सेवा, डीटीएच सेवा, तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग, घरभाडे, आरोग्यसेवा, शाळेची फी, कुरियर सेवा, मेट्रोचा प्रवास, एअरिएटेड पेये, शाम्प, अत्तरे, सोने, सिगरेट्स, पान मसाला, बटर, चीज, सुकामेवा, रेझर, मनगटी घड्याळ, व्हिडिओ गेम्स, स्टोव्ह, इलेक्ट्रिक हॉट प्लेट, वॉल पेपर, प्लास्टर, टायर, प्लास्टिक वस्तू. 

LEAVE A REPLY

*