जिल्हा बँकेसह व्यापारी बँकांमार्फत पीक कर्ज पुरवठा करा ! – ना.दादा भुसे

0
धुळे  / शेतकर्‍यांना पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी सुलभ पीक कर्ज अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात शेतकर्‍यांना चालू वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह व्यापारी बँकांमार्मत पीक कर्ज पुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.
सुलभ पीक कर्ज अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालायात झालेल्या बँकर्सच्या बैठकीत पालकमंत्री श्री.भुसे बोलत होते.
यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरण, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर, जिल्हा उपनिबंधक जे.के. ठाकूर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर बूध, कोशागार शाखेचे व्यवस्थापक रमेश गोयल आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भुसे म्हणाले, या अभियानाचा कालावधी 5 जून ते 31 जुलै 2017 पर्यंत आहे. आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील डीएलसीसी समिती निर्णय घेईल.

या अभियानात महसूल, कृषी, सहकार, ग्रामविकास या विभागांचा समावेश राहील. जिल्ह्यातील व्यापारी बॅकांना डीएलसीसी मार्मत पीक कर्जाचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे.

या बॅकांना 2017-18 साठी शेतकरी संख्येचा देखील लक्ष्यांक देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील व्यापारी बँकांच्या शाखा असलेल्या गावात वेळोवेळी कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात करावे.

यावेळी बोलताना रोहयो व पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले, शेतकर्‍यांकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या,विविध कार्यकारी संस्थेच्या कर्जाची थकबाकी नसल्याबाबत व अशा शेतकर्‍यांना व्यापारी बँकेमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधी नाहरकत दाखला उपलब्ध करुन द्यावा.

खरीप-2017 मध्ये पीक कर्ज घेण्यास पात्र असलेल्या शेतकर्‍यांना पीक कर्ज मंजूर करण्यासाठी संबंधित व्यापारी बँकेच्या प्रतिनिधी बँकेचा विहित नमुन्यातील कर्जासाठीचा अर्ज मेळाव्यात उपलब्ध करुन द्यावेत.

हा अर्ज भरुन घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी, गटसचिव शेतकर्‍यांना सहकार्य करतील. कर्ज प्रकरणे संबंधित व्यापारी बँकेने शक्यतो त्याच दिवशी मंजूर करावीत.

मात्र, कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त तीन दिवसांत शेतकर्‍यांना पीक कर्ज मंजूर करण्याबाबत बँकानी निर्णय घ्यावा.

याप्रमाणे कर्ज मंजूर केलेल्या शेतकर्‍यांना संबंधित व्यापारी बँक तातडीने पीक कर्ज वितरण करेल. बँकांच्या प्रचलित धोरणानुसार रुपये 1 लाखापर्यंत रकमेचे पीक कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची स्थावर मालमत्ता पीक कर्जासाठी तारण घेवू नये.

खातेदार शेतकर्‍यांची यादीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या थकबाकीदार शेतकर्‍यांचा तपशील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरीक्षक, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे गटसचिव यांनी नमूद करुन ही यादी कर्ज मेळाव्यापूर्वी संबंधित व्यापारी बँकांना उपलब्ध करुन द्यावी.

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, संबंधित व्यापारी बँकेचे अधिकारी यांनी समन्वय करुन पीक कर्ज मेळाव्यापूर्वी किमान तीन दिवस आधी संबंधित गावातील शेतकर्‍यांना मेळाव्यास उपस्थित राहण्याबाबत दंवडीद्वारे आवाहन करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*