जावयाच्या डोक्यात दगड घालून खून; गुन्हा दाखल

0

पाथर्डी (प्रतिनिधी) – विवाहित मुलीला त्रास देतो म्हणून जावयाच्या डोक्यात दगड घालून सासर्‍याने खून केला. गुरुवारी दुपारनंतर दैत्यनांदूर शिवारात ही घटना घडली. घटनेनंतर सुरेश दिनकर दहीफळे (वय 48) हा पळून गेला.

 

पोलिसांनी पाठलाग करून कोरडगाव शिवारात दहीफळे याला ताब्यात घेतले.
तालुक्यातील दैत्यनांदूर येथील नारायण शंकर पालवे (वय 26) याचा विवाह गावातीलच सुरेश दहीफळे यांच्या मुलीशी झाला होता.

 

त्यांना सहा महिन्याचा एक मुलगा आहे. नारायण हा पत्नीला त्रास देतो म्हणून त्याचा सासरा सुरेश दहीफळे याच्याशी नेहमी वाद होत होता. गुरुवारी नारायण पालवे त्याच्या सासर्‍याच्या वस्तीकडे गावाबाहेर जात असताना रस्त्यातच सासरा सुरेश दहीफळे व नारायण यांच्यात वाद झाला. सुरेश दहीफळे याने जावई नारायण पालवे याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. व दहीफळे पळून गेला.

 
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस हवालदार आर. के. रांझणे, पोलीस काँ.सचिन शिंदे व नय्युम पठाण यांनी संशयित आरोपी सुरेश दहीफळे याचा पाठलाग केला. कोरडगाव शिवारात एका हॉटेलशेजारी त्याला पाठलाग करून पकडले.

 

नारायण पालवे यांच्या वडिलांनी पोलिसांत खुनाची फिर्याद दाखल केली आहे. नारायण पालवे यांचा भाऊ भारतीय सेनेत आहेत. दैत्यनांदूर गावात खुनाच्या घटनेचे पडसाद उमटले आहेत. पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतल्याने वातावरण शांत झाले आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार पुढील तपास करीत आहेत.

 

 

  तीन दिवसांपूर्वी मयत नारायण पालवे याचे छपराचे घर पेटले होते. याबाबत तक्रार दाखल नाही. मात्र आता याचाही तपास पोलीस घेत आहेत. खुनाचे नेमके कारण समजले नाही.तपासातच ते उघड होईल.

LEAVE A REPLY

*