चिंतनशील गानसरस्वती

0

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी गायलेला प्रत्येक राग हा अनेक भावभावनांचे कल्लोळ निर्माण करणारा असायचा. परमेश्‍वर म्हणजे दुसरे-तिसरे काही नाही, हे या गानसरस्वतीचे गाणे ऐकताना लक्षात यायचे. माईंनी अर्थात मोगूबाई कुर्डीकर यांनी किशोरीताईंना शिकवले. पण किशोरीताईंनी स्वत:ची वेगळी शैली विकसित केली. त्या स्वत: चिंतनशील होत्या. निर्मिती क्षमता, प्रयोगशीलता आणि प्रचंड ऊर्जा हे किशोरीताईंचे गुण होते. त्यामुळे त्यांच्या गाण्यात सतत नावीन्य दिसत असायचे. त्यांच्या या ऊर्जेपुढे आणि निर्मिती क्षमतेपुढे भलेभले नतमस्तक होत असत.

परमेश्‍वर आहे की नाही या वादात मला पडायचे नाही. पण वेगवेगळ्या रूपात त्याचे दर्शन घडत असते हे मात्र निश्‍चित. आपल्याला एकदा तरी परमेश्‍वर भेटावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण प्रत्येकालाच तो भेटतो असे नाही. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या दिव्य स्वरांच्या रूपाने मला त्याचे दर्शन सातत्याने घडले. गाणे तर आपण अनेकदा ऐकतो.

पण एखादा स्वर ऐकताना तो दैवी अनुभूती देऊन जातो. किशोरीताईंच्या स्वरांनी लाखो रसिकांना वर्षानुवर्षे ही अनुभूती दिली आहे. त्यांचे अभंग ऐकणे म्हणजे अमृतयोगच. त्यांचे देहावसान माझ्यासारख्या असंख्य रसिकांना पोरकेपण देऊन जाणारे आहे. त्यामुळे झालेली शोकमग्नता शब्दांतून व्यक्त न होणारी आहे.

त्यांच्या सेवेत राहून त्यांच्याकडे गाणे शिकता आले हे माझे भाग्यच म्हणायला हवे. त्यांना गानसरस्वती का म्हणतात हे त्यांचे गाणे ऐकले की लक्षात येते. किशोरीताई गात त्यावेळी तो राग कोणता आहे, त्यातील वर्ज्य-अवर्ज्य स्वर कोणते, ते गाणे कोणत्या घराण्याचे आहे, असे प्रश्‍न रसिकांना कधीच पडले नाहीत. स्वरांच्या आनंदात चिंब न्हाऊन निघताना रसिक या सार्‍या गोष्टींचे भान हरवून जात असेे. त्यांचे गाणे आपली भेट थेट नादब्रह्माशी घालून देते.

षड्ज, गंधार, पंचम हे स्वर त्यांची ठरलेली कंपनसंख्या घेऊन येतात. त्यामुळे त्या स्वरांची प्रकृती जणू ठरलेली असते. पण प्रत्येक गायकाचा पंचम, षड्ज, गंधार त्या त्या गायकाचीही प्रकृती घेऊन येत असतो. त्यामुळे किशोरीताईंच्या गळ्यातून हे स्वर बाहेर येत तेव्हा ते इतर गायकांपेक्षा खूपच वेगळे वाटत. त्या स्वरांवर आपली एकदम भक्तीच जडते. या स्वरांमुळे आपल्याला नतमस्तक व्हावे, असे वाटू लागते. परमेश्‍वर म्हणजे वेगळे काही नाही, हे किशोरीताईंचे गाणे ऐकताना लक्षात येते. त्यामुळेच त्यांना दिलेली गानसरस्वती ही उपाधी किती सार्थ आहे, ते लक्षात येते.

किशोरीताईंचे गाणे हा एक दैवी अनुभव असतो. त्यांनी गायलेला प्रत्येक राग वेगवेगळ्या भावभावनांचे कल्लोळ निर्माण करणारा असतो. किशोरीताईंचे गाणे ऐकताना त्यामागची त्यांची तपश्‍चर्या जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर यांनी त्यांच्याकडून स्वरसाधना कशा प्रकारे करून घेतली असेल याची कल्पना किशोरीताईंचा स्वर ऐकला की येते. त्यांच्या सहवासात प्रदीर्घ काळ राहून गाणे शिकता आले हे माझे थोर भाग्य. मागच्या जन्माची पुण्याई गाठीशी असल्याशिवाय हे भाग्य लाभत नाही यावर माझा विश्‍वास आहे.

बाबांच्या (प्रभाकर पणशीकर) नाट्यसंपदा या संस्थेच्या वतीने बसवण्यात आलेल्या ‘तुझी वाट वेगळी’ या संगीत नाटकासाठी किशोरीताईंनी संगीत दिले होते. त्यानिमित्ताने त्यांच्याकडे आमचे येणे-जाणे सुरू झाले. त्यांच्याकडे गाणे शिकणे हा अनुभव इतका दिव्य होता की तो शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. त्यांच्याकडे शिकताना त्यांचा घरचा रियाज ऐकता, अनुभवता आला. हा रियाज आणि लोकांसमोरच्या मैङ्गलीतले गाणे यामधील ङ्गरक लक्षात आला. रियाज ऐकणे हीदेखील एक दिव्य अनुभूती असायची.

maxresdefault

अनेकदा रियाज ऐकताना आम्हा सर्वांचीच अशी तंद्री लागत असे की किती वेळ गेला याचा पत्ताच लागत नसे. आमची घरे जवळच असल्याने मी रोज किशोरीताईंच्या घरी जात असे.

माई अर्थात मोगूबाई कुर्डीकर यांच्या अत्यंत शिस्तबद्ध तालमीत किशोरीताईंचे गाणे बहरले. पण इतकी कडक तालीम असूनही त्यांनी पुढे स्वत:ची वेगळी शैली तयार केली. वास्तविक माईंच्या गाण्यावर खॉंसाहेबांचे संस्कार झाले होते. तेच गाणे माईंनी आपल्या मुलीला अर्थात किशोरीताईंना शिकवले. पण या संस्कारातूनही किशोरीताईंनी स्वत:ची वेगळी शैली विकसित केली हे विशेष.

‘ती गायली नसती तरच नवल होते’ असे माई किशोरीताईंबद्दल म्हणत असत. त्यांच्या गाण्यातील भाव, रंग इतका विलक्षण होता. त्यांचे गाणे इतके लोकगामी आहे आणि त्याचा स्तर इतका वरचा आहे की विद्वान आणि सामान्य रसिक या दोघांनाही तो तितकाच भुलवतो. किशोरीताईंच्या गाण्याची ही खासियत दुर्मिळ स्वरुपाची आहे. त्या स्वत: चिंतनशील होत्या. प्रदीर्घ चिंतनातून त्यांचे गाणे साकारले होते.

त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी १५ वर्षांपूर्वी त्यांचे गाणे ऐकले असेल त्यांनी आज ते ऐकले तर त्यांना ते वेगळेच वाटेल. निर्मिती क्षमता, प्रयोगशीलता आणि प्रचंड ऊर्जा हे किशोरीताईंचे गुण होते. त्यामुळे त्यांच्या गाण्यात सतत नावीन्य दिसायचे. त्यांच्या या ऊर्जेपुढे आणि निर्मिती क्षमतेपुढे भलेभले नतमस्तक होत असत.

काही वर्षांपूर्वीच त्यांचे ‘स्वरार्थरमणी’ हे सांगीतिक जडणघडणीविषयक पुस्तक प्रकाशित झाले. भगवद्गीता सोप्या भाषेत सांगण्यासाठी संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिली. पण आज इतक्या वर्षांनंतर आता ज्ञानेश्‍वरीही समजावून सांगावी लागते आहे. ‘स्वरार्थरमणी’ पुस्तकही असेच आहे. किशोरीताईंचा नाट्यशास्त्र, काव्य यांचा दांडगा अनुभव आहे. वयाची ऐंशी वर्षे पार केल्यानंतरही त्यांची तयारी पाहून थक्क व्हायला होत असे. माझ्यासारखा गायकही त्यांच्या वेगापुढे कमी पडायचा. त्यांची प्रतिभा विलक्षण होती.

जगभरच्या रसिकांनी ती सातत्याने अनुभवली आहे. किशोरीताईंच्या अनेक मैङ्गली मी अनुभवल्या आहेत. त्यांच्या सहवासातील अनेक क्षण आठवतात. त्या सांगायच्या झाल्यास शब्द अपुरे पडतील. दिल्लीत झालेेली त्यांची अशीच एक मैङ्गल आठवते. त्यावेळी त्यांच्या साथीला प्रसिद्ध सारंगीवादक साबरीखॉंसाहेब होते. किशोरीताईंचे गाणे त्या दिवशी इतके रंगले की रसिक श्रोतेवर्ग अक्षरशः मंत्रमुग्ध आणि तल्लीन झाला होता.

खॉंसाहेबांनी गाणे मध्येच थांबवत माईक हाती घेतला आणि प्रेक्षकांना उद्देशून ते म्हणाले, ‘याला म्हणतात गाणे’ त्या दिवशी किशोरीताई बागेश्री गायल्या. असा बागेश्री यापूर्वी मी अनुभवला नव्हता. राग बागेश्रीचा एक पडदा बाजूला झाला तर किशोरीताई आणि बागेश्री या एकच आहेत, असे वाटण्यासारखा तो राग त्यांनी आळवला. हे गाणे रेकॉर्ड झाले नव्हते. कार्यक्रमानंतर बोलताना किशोरीताई आम्हाला म्हणाल्या, ‘एखादी गोष्ट अशी मनापासून, हृदयापासून होते तेव्हा ती यंत्रे पकडू शकत नाहीत.

’ किशोरीताईंमुळेच मला माईंचा अर्थात मोगूबाईंचा सहवास लाभला. त्यांच्याकडूनही थोडेङ्गार शिकता आले. मोगूबाईंना गानतपस्विनी तर किशोरीताईंना गानसरस्वती म्हणत. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य भारतीतीर्थस्वामी यांच्या हस्ते किशोरीताईंना गानसरस्वती किताब बहाल करण्यात आला. या कार्यक्रमाला आम्ही त्यांचे शिष्य उपस्थित होतो. वेगवेगळ्या ठिकाणी १० महायोगी ध्यानस्थ बसले असून त्यांच्या पुण्याईवरच या जगाचा कारभार चालतो, असे मानले जाते.

या योग्यांना कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा नसते. पण त्यांच्यामुळेच जग चालते, हे सत्य असते. किशोरीताईंचे अस्तित्व हे त्या योग्यांसारखेच होते. ‘स्वरांमुळे मी आहे’ असे किशोरीताई म्हणत असल्या तरी त्यांच्यामुळेच गाणे होते असे मी म्हणेन. त्यांचे चिंतन हेच आजच्या पिढीला तारणारे आहे, असा मला विश्‍वास वाटतो.

कोणतीही गायिका-गायक किशोरीताईंचे गाणे ऐकल्याशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आज त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली निर्वात पोकळी किती मोठी आहे हे सांगणे कठीण आहे. ईश्‍वर त्यांना सद्गती देवो हीच प्रार्थना!

– पं. रघुनंदन पणशीकर
(लेखक प्रसिद्ध गायक असून किशोरी आमोणकर यांचे शिष्य आहेत)

LEAVE A REPLY

*