ग्रा.पं.च्या नियोजनशुन्य कारभारामुळे उमर्देत पाणीटंचाई

0
नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-शहरापासून अवघ्या सात कि.मी. अंतरावर असलेल्या उमर्दे खुर्द गावात नियोजनाभावी तीव्र कृत्रीम पाणीटंचाई जाणवत आहे.
त्यामुळे ग्रामस्थांना उन्हातान्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून विकतसुद्धा पाणी मागविण्याची वेळ आली आहे.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाच्या सेवा सुविधा व विविध उपाययोजना असतांनाही त्या राबवितांना होत असलेल्या गलथान कारभारामुळे ग्रामीण भागात विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत.

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनही लक्ष देत नसल्यामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. उमर्दे खुर्दे गावात पिण्याच्या पाण्यासाठी वडवद गावानजीक स्वतःच्या मालकीची विहिर आहे.

या विहिरीतून गेल्या अनेक वर्षांपासून गावाला पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही वर्षांपासून गावाचा विस्तार वाढल्याने या व्यवस्थेत सुधारणा करून पूर्ण तीन कि.मी.ची पाईपलाईन नव्याने करण्यात आली आहे.

मात्र गावात समस्या सुटण्याचे नाव घेत नसून अधिाकाधिक तीव्र स्वरूपाने वाढत आहे. शासनातर्फे तीन गांव पाणीपुरवठा योजनेतून चौपाळे, उमर्दे व दहिंदुले या गावांना सामील करून भोणे येथील तलावातील पाणी चौपाळे येथे दुहेरी फिल्टर प्रणालीतून येत होते.

त्यामुळे उमर्दे गावात पाण्याची समस्या दूर झाली होती. त्यावेळी तत्कालिन आदिवासी विकासमंत्री आ.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ होवून सदर योजनेतून पाणीपुरवठा होत असल्याने पाणी समस्येवर निदान झाले होते.

मात्र सदर योजना बंद पडल्याने उमर्दे गावाला पुन्हा पाण्याच्या समस्यामुळे अपल्या विळख्यात घेतले. तेव्हापासून आजपर्यंत ग्रामस्थ पाण्याच्या समस्येला तोंड देत आहेत.

सार्वजनिक नळ स्टँडही राहिले नाही. यामुळे खाजगी नळ तेवढे अस्तित्वात असून मात्र पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत पाणी मिळविण्यासाठी नागरीकांची धडपड सुरु असते.

अनेकांना रोजगार सोडून पाण्यासाठी वणवण होत आहे. गावात गेल्या दोन तीन वर्षापुर्वी पााीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी बदलूनसुध्दा पाण्याची समस्या सुटलेले नाही.

याबाबत पाण्याच्या व्यवस्थेेसाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून नियोजन होत नसल्याची खंत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

उमर्दे खुर्दे हे गांव नंदुरबार शहरापासून सात कि.मी. अंतरावर असूनही शासनाच्या बहुतांश योजना या कागदावरच दिसून येतात. यामागील कारणे पाहता येथील ग्रामपंचायत प्रशासन व नियुक्त पदाधिकार्‍यांची उदासीनता आहे.

गावांत या व्यतिरीक्त दुसरी कोणतीही पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. गावांत दोन हातपंप नादुरूस्त स्वरूपात असून त्यांची दुरूस्ती केल्यास बर्‍यापैकी ग्रामस्थांना मोठा दिलासा होणार आहे.

मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे वर्षानुवर्ष हातपंपाची अवस्था आहे, त्यापेक्षा खालावत आहे. तरी कोणत्याही पदाधिकार्‍यांचे याकडे लक्ष जात नाही.

गावात जुनी विहिर असून पाण्याअभावी ती तळाला लागली आहे. यामुळे अनेकांना गुरांनाही पाजण्यासाठी पाणी नसल्याने गुरे, ढोरे विकावी लागली आहेत.

गेल्या महिन्या भरापूर्वी अशाच नाराजीमुळे भिलाटी परिसरातील नागरीकांनी तीव्र निषेध नोंदवली होता. त्याचा परिणाम जलवाहिनीची तोडफोड करण्यात आल्याची माहिती नागरीकांनी दिली.

तसेच घाण पाणी पुरवठा गावात होत असल्याचा रोषही नागरीकांनी काढला. यावरही गावात पाणीपुरवठा व पाण्याची समस्या सोडविण्यासंदर्भात कोणीतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही व त्यावर मार्ग काढण्यात आलेला नाही.

पाण्याची समस्या ग्रामस्थांसमोर जैसे थे आहे. स्थानिक प्रशासनाला या समस्येची जाणीव कधी होईल, याबाबत मात्र ग्रामस्थ हतबल होतांना दिसतात.

LEAVE A REPLY

*