ग्राहक प्रबोधनाचे पाऊल

0
‘ग्राहक देवो भव’ किंवा ‘ग्राहक हाच राजा’ अशा शब्दांत ग्राहकाचे मोठेपण सांगितले जाते. परंतु ग्राहक हा खरेच ‘राजा’ असतो का? आज काय चित्र आहे? किरकोळ दुकानापासून मोठमोठे शोरूम व सेल या ना त्या प्रकारे ग्राहकांची फसगत करतात.

‘सूट’ अथवा ‘एकावर एक मोफत’ची आमिषे दाखवून विक्रेते अथवा कंपन्या आपला कार्यभाग साधतात. मापात पाप करून ग्राहकांची फसवणूक करण्यात काहींचा हातखंडा असतो. मात्र आपली फसवणूक किंवा लूट होत असल्याचे सामान्य ग्राहकांच्या लक्षात येत नाही. नाशिकचे ग्राहकहितदक्ष वैधमापनशास्त्र अधिकारी जयंत राजदरकर यांनी एक विधायक पाऊल उचलले आहे.

ग्राहकांना हक्काबद्दल जागरुक करण्यासाठी नाशकात राज्यातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र त्यांच्या कल्पनेतून उभारले गेले आहे. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा व सीएट कंपनीच्या अर्थसहाय्यातून मेरी वसाहतीत वैधमापनशास्त्र विभागाच्या कार्यालयात केंद्र सुरू झाले आहे. त्याचा लाभ कोणीही घेऊ शकतो.

चार दालनांत विभागलेल्या या केंद्रात ‘शहाणे करून सोडावे सकळ जन’ अशी मार्गदर्शक माहिती चित्ररूपाने ग्राहकांना मिळेल. ग्राहक संरक्षण कायद्याचीही माहिती तेथे दिलेली आहे. ग्राहकांना वैधमापन कायदा सहजपणे समजावा व त्यांची फसवणूक टळावी म्हणून सुरू झालेल्या प्रबोधन केंद्राचा हा उपक्रम यशस्वी झाल्यास तो राज्यासाठी पथदर्शी ठरेल. विद्यार्थ्यांनी हे केंद्र जरूर पाहायला हवे.

नाशिकच्या प्रत्येक नागरिकाने तेथे भेट दिल्यास ग्राहक म्हणून आपल्या हक्कांची जाणीव जागृत होण्यास मदत होईल. ग्राहकांना प्रबुद्ध करण्याचे अनेक प्रयोग यापूर्वीही झाले आहेत; पण असे प्रयोग कुठेतरी भ्रष्टाचाराच्या गाळात रुतल्याने फसले आहेत. ग्राहकांना फसवून निर्दोष सुटण्याचे कसब काही महाभागांनी आत्मसात केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही ग्राहकांच्या फसवणुकीचे दुष्टचक्र थांबलेले नाही.

ग्राहक जागरूक होत असला तरी फसवणुकीचे नवनवे फंडे अवलंबले जातात. त्याचा प्रत्यय ग्राहक आता ‘ऑनलाईन’सुद्धा घेत आहेत. सरकारी अधिकार्‍यांमध्ये सामान्य जनतेविषयी नकारार्थी दृष्टिकोन मुक्कामी असतो. तरीही राजदरकर यांच्यासारखे काही मोजके अधिकारी जनहिताला प्राधान्य देऊ पाहत आहेत हे कौतुकास्पद आहे. ग्राहक प्रबोधनाची सुरुवात नाशिकपासून झाली आहे. त्याबद्दल नाशिककर अशा अधिकार्‍यांना धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाहीत.

LEAVE A REPLY

*