ग्रामसेवक युनियनची 9 सप्टेंबरला निवडणूक

0

 

 

राज्य अध्यक्षपदासाठी ढाकणे, सरचिटणीसपदासाठी जामोदे पुन्हा रिंगणात

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य ग्रामसेवक युनियनच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 9 सप्टेंबरला होणार्‍या या निवडणुकीसाठी विद्यमान राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे. त्यानुसार ढाकणे व जामोदे दोघेही 11 ऑगस्टला शेगांव (जि.बुलढाणा) येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्य ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्ष, सरचिटणीसपदासह दोन उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, संयुक्त सचिव, कायदेशीर सल्लागार अशा एकूण 26 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

 

मागील दोन वर्षे राज्य अध्यक्षपद सांभाळणार्‍या ढाकणे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत संघटनेवरील वरचष्मा कायम ठेवण्याचा निश्‍चय केला आहे. ग्रामसेवकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी दोन वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा समोर ठेवत ढाकणे यांनी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन ग्रामसेवकांना केले आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम 12 ऑगस्टपर्यंत आहे.

 

14 ते 23 ऑगस्ट या कालावधीत अर्ज माघारीची मुदत असून 9 सप्टेंबरला प्रत्यक्ष निवड प्रक्रिया होणार आहे. राज्य अध्यक्ष ढाकणे हे अर्ज दाखल करतानांच मोठ्या शक्तीप्रदर्शनाच्या तयारीनिशी शेगांवला रवाना झाले आहे. नगर जिल्ह्यासह त्यांचे राज्यातील 700 ते 800 समर्थक शेगांवमध्ये त्यांच्यासमवेत असणार आहेत.

 

 

या निवडणुकीबाबत बोलताना राज्य अध्यक्ष ढाकणे म्हणाले की, राज्यातील सुमारे 22 हजार ग्रामसेवकांच्या सहकार्यातून दोन वर्ष राज्य अध्यक्ष म्हणून काम करण्याची असंधी मिळाली. या काळात सर्वांच्या अपेक्षापूर्ती करण्याचे प्रयत्न केले. आताही नाशिक, नागपूर, अमरावती, मराठवाडा, कोकण, पुणे विभागातील पदाधिकारी, ग्रामसेवकांशी चर्चा केली.

 

 

या चर्चेतून पुन्हा एकदा राज्य अध्यक्षपद स्वीकारावे असा सूर निघाल्याने अर्ज दाखल करणार आहोत. सर्व ग्रामसेवकांच्या सहकार्यातून ही निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्‍वास वाटतो. राज्य अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर ढाकणे यांनी संपूर्ण राज्यात संघटना मजबूत करण्यावर भर दिला. राज्यभर सातत्याने दौरे करून ग्रामसेवकांचे प्रश्‍न समजून घेतले.

 

 

स्थानिक पातळीवरील अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे राज्य अध्यक्षपदी ढाकणे यांची तर सरचिटणीसपदी जामोदे यांची निवड बिनविरोध होईल, असा विश्‍वास बाळासाहेब कडू, बाळासाहेब आमरे, युवराज ढेरे, अशोक नरसाळे, रमेश बांगर, सुनील नागरे आदींनी व्यक्त केला आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*