गोदावरीचे दोन्ही कालवे फुटले!

0

आवर्तन थांबले! उजव्याचा ढापा तुटला तर डाव्याची मोरी लिक

अस्तगाव (वार्ताहर)- गोदावरीच्या  दोन्ही कालव्यातून सोमवारी रात्री 9 वाजता पाणी सोडण्यात आले. मात्र डावा कालव्याचे पाणी चार किमी जात नाही तोच तो फुटला. उजवा कालव्यानेही डाव्याची रि ओढत तो ही 20 किमी अंतरात फुटला.   दोन्ही कालवे फुटल्याने मुखाजवळ बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरीचे आवर्तन एक ते दोन दिवसांनी लांबले आहे.
गोदावरीचा कोपरगावच्या दिशेने वाहाणारा डावा कालवा नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यापासून चार किमी अंतरात नांदूरमधमेश्‍वर परिसरात नवीन मोरीचे बांधकाम चालू आहे. तेथेच घळ (लिक) पडून तो फुटला. सोमवारी रात्री 9 वाजता नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍याची लेव्हल आल्यानंतर दोन्ही कालवे सोडण्यात आले होते. चार किमी अंतरावर घळ पडल्याने हा कालवा रात्रीच मुखाजवळ बंद करण्यात आला होता.
उजवा कालवा नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यापासून 20 किमी 200 मीटर अंतरात सिन्नर तालुक्यातील दहिवडी गावाजवळ तो तुटला. ब्रिटीशकालीन मोरी (कलव्हर्ट) तुटल्याने घळ पडला. त्यामुळे पाणी मोरी खालून वाहायला लागले. हा प्रकार मंगळवारी सकाळी 11 वाजता घडला. त्यामुळे जलसंपदा विभागाने त्यावरील पाणी वरील भागात अडवत पाणी योजनांना सोडले व तासाभरात 12 वाजता कालवा बंद करण्यात आला. या दरम्यान बरेचसे पाणी वाया गेले.

जलसंपदाच्या राहाता उपविभागाचे उपअभियंता संजय कासनगुट्टुवार, कोपरगावचे उपविभागीय उपअभियंता भास्कर सुरळे, दारणा प्रकल्पाचे उपअभियंता एस. के. मिसाळ यांनी या कालव्यांची पहाणी करुन कालव्याच्या दुरुस्तीसाठी युध्दपातळीवर यंत्रण उभारली आहे. उजव्या कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी संजिवनी कारखान्याने जेसीबी यंत्र दिले आहे. शाखा अभियंता ओ. एस. भंडारी, कालवा निरीक्षक बी. व्ही. मेहेत्रे, एम. आर. कोळी, आर. एस. कुर्‍हे, श्री. बागुल आदींनी या कामात जुंपले आहेत.
गोदावरीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन रात्रीतून सुरु झालेले आहे. नांदूरमधेश्‍वर परिसरात एका कंत्राटदाराचे काम सुरु असल्याने त्याने कालव्याच्या दुरुस्तीसाठी मदत केली. त्यामुळे हे काम तातडीने होऊन रात्री आठ वाजता पुन्हा या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. हेे पाणी 150 क्युसेक ने सोडण्यात आले आहे. हा कालवा 22 तासांच्या खंडानंतर पुन्हा सुरु झाला आहे.

मात्र उजव्याचे कामास उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कालव्यातून सायंकाळपर्यंत पाणी वाहत होते. त्यामुळे कालवा दुरुस्तीच्या कामात अडथळ येत होते. पाण्यात काम करणे मुश्किल असल्याने सकाळी या मोरीचे किती नुकसान झाले. त्याचा अंदाज आला नाही. हा अंदाज घेतल्यानंतरच कालवा दुरुस्तीचे काम करण्यात येणारआहे. त्यामुळे हा कालवा दुरुस्त होण्यास दोन दिवसांचा कालवधी लागण्याची शक्यता आहे.
गोदावरीच्या कालव्यांचे कामे 100 वर्षाहून अधिक काळाची आहेत. ही कामे जीर्ण झाल्याने आवर्तन काळात ते तुटतात. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. राहाता, कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना गोदावरीचे पाणी या स्थितीमुळे अशाश्‍वत वाटू लागले आहे.

या दोन्ही कालव्यांची वहन क्षमता वाढवून, कालव्यांचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे. काही कामे सुरु आहेत. परंतु त्या कामाचा दर्जा तपासण्याची गरज आहे. अस्तगाव परिसरात एका नवीन काम झालेल्या मोरीतून गेल्या आवर्तनात पाणी लिक झाले होते. दुरुस्ती आवर्तनानंतर केली. परंतु ती कशी झाली हे या आवर्तनात समजणार आहे.

 गोदावरीच्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी सिंचनाच्या आवर्तनाची चातकासारखी वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे या वर्षी आवर्तनाचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हवे त्यावेळी पाणी मिळाले नाही. त्यामुळे पिकांची अवस्था वाईट बनली आहे. त्यातच कालव्यांची फुटतूट ही सुरु झालेली आहे. तहानलेला गळक्या तांब्यातून पाणी पितो अशी अवस्था या कालव्यांची झाली आहे.

दारणाचे पाणी घटविले!
दोन्ही कालवे फुटल्याने नांदूर-मधमेश्‍वर बंधार्‍यात दारणा धरणातून 1600 क्युसेकने पाणी वाहुन येत होते. ते पाणी मंगळवारी दुपारी 12 वाजता 500 क्युसेकने घटविण्यात आले आहे. ते 1100 क्युसेक ने सुरु आहे. नांदूरमधमेश्‍वर ची लेव्हल मेंटेन करण्यासाठी हे पाणी कमी करण्यात आले आहे. मुकणेतून 1000 क्ुयसेकने पाणी सोडण्यात येत आहे. असे 2100 क्युसेक ने पाणी नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍याच्या दिशेने वाहत आहे. कोपरगावच्या दिशेने वाहाणारा डावा कालवा लवकर सुरु होऊ शकतो.

LEAVE A REPLY

*