गिरणी कामगाराचा खून

0

राहुरी फॅक्टरी येथील घटना  पत्नीसह एकाला अटक

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे भाऊसाहेब भिकाजी शिंदे या 60 वर्षीय गिरीणी कामगाराचा शनिवार दि. 6 मे रोजी खून झाल्याची घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयावरून पत्नीसह एकाला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब भिकाजी शिंदे (वय वर्षे 60) हे सुरत येथे एका कापडाच्या गिरणीमध्ये मजूर म्हणून काम करत होते.

 

ते तीन चार महिन्यातून एकदा पत्नी व मुलांना भेटायला येत असत. याच उद्देशाने ते गुरूवार दि. 4 मे रोजी सुरतहून राहुरीकडे आल्याची माहिती मिळाली. यादरम्यान दि. 6 मे रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या पूर्वी ते राहुरी फॅक्टरी येथील त्यांच्या राहात्या घरात ते निस्तब्ध्द पडलेले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी राहुरी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले.

 
या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. पोलिसांनी राहुरी फॅक्टरी येथून शिंदे यांचा मृतदेह काल ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनाला पाठविल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, शवविच्छेदन करणार्‍या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर क्षीरसागर यांनी शिंदे यांचा गळा दाबून मृत्यू झाल्याचा अभिप्राय दिल्याने ही आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा संशय पोलिसांचा खरा ठरला. राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यादिशेने तपासाची चक्रे वेगाने फिरली.
याप्रकरणी मयत शिंदे यांची पत्नी व योगेश उर्फ पप्पू सुधीर चोथे (वय 25, रा. देवळाली प्रवरा) यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लक्ष्मण भोसले करत असून आरोपींना तत्काळ पोलिसांनी अटक केली आहे.

 

LEAVE A REPLY

*