गावोगावी पर्जन्यमापक यंत्रे

0

कृषी समिती : सभापती अजय फटांगरे यांची माहिती

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची पहिली बैठक सभापती अजय फटांगरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. या बैठकीत प्रत्येक कृषी मंडलातील गावात पर्जन्यमापक यंत्रे बसवण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच पुढील महिन्यांत खरीप हंगामाला सुरुवात होणार असून कृषी विभागाने हंगामाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना सभापती फटांगरे यांनी यावेळी दिल्या.

 
गेल्या वर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने राबवलेल्या योजना आणि त्याची फलनिष्पत्तीची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच यंदा विभागाचे तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक आणि त्यातील योजनानिहाय तरतुदी समितीच्या सदस्यांना देण्यात आल्या. जिल्ह्यात दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी अधिक असते. सध्या प्रत्येक कृषी मंडलात एक पर्जन्यमापक यंत्र आहे. मात्र, प्रत्येक मंडलातील गावात पावसाचे प्रमाण अचूक पध्दतीने नोंदवण्यासाठी प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्रे बसवण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.

 

कृषी विभागामार्फत विहिरींची योजना राबवण्यात येते. मात्र, योजनेतून विहीर मंजूर करण्यासाठी कमांड आणि नॉन कमांड ही अट आहे. यामुळे योजनेच्या लाभापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहत आहेत. यासाठी ही अट रद्द करण्यात यावी अशी मागणी नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी केली. सध्या सरकार शेतकर्‍यांच्या तुरीची खरेदी करत आहे. त्यात सरकारने काळजी घेत व्यापार्‍यांची तूर खरेदी करू नये, अशा सूचना बैठकीत सदस्यांनी मांडल्या.

 
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने राबवण्यात येणार्‍या योजनांची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील संसारे यांनी सदस्यांना दिली. महावितरण वीज कंपनीने श्रीगोंदा आणि संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्यचा अडचणी समजून घेत या ठिकाणी नियमित आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 1 जूनपासून खतांची विक्रीवर शेतकर्‍यांना सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शेतकर्‍यांना खते खरेदीसाठी आधारकार्डची आवश्यकता आवश्यक राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

 
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांच्यासह सदस्य दादासाहेब शेळके, रामदास भोर, पुरूषोत्तम तागड, डॉ. किरण लहामटे, दत्तात्रय काळे, दिनकर बर्डे, वंदना लोखंडे, शांताबाई खैरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*