गरज इतिहासातून धडे घेण्याची !

0

इंग्रजांच्या दृष्टीने मध्यकालीन भारताची समग्र कथा हिंदू-मुस्लिमांमधील संघर्षाची कथा होती. वस्तूत: अकबर आणि राणाप्रताप यांसारख्या नायकांनी आपापल्या पद्धतीने इतिहास निर्माण केला आहे. दोघांमध्ये तुलना करण्याची अथवा कोणाला कमी श्रेष्ठ समजण्याची गरज नाही. नायकांच्या कर्तृत्वानेच इतिहास घडतो. त्यांचे कर्तृत्व समजून घेऊन त्यापासून बोध घेण्याची गरज आहे. तसे झाले तरच उद्यासाठी प्रेरक ठरणारा वास्तवाधारी इतिहास निर्माण होऊ शकेल.

महाराणी पद्मिनीच्या कथेचा आधार घेऊन तयार होणार्‍या चित्रपटाचा वाद राजस्थानापासून महाराष्ट्रापर्यंत पसरला. इतिहासाची मोडतोड करून आपल्याला कमी लेखण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे रजपुतांना वाटत आहे. वस्तूत: ते केवळ एवढ्यानेच त्रस्त नाहीत, रजपुतांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला जातो, असेही त्यांना वाटते. आता ते त्यात सुधारणा करू इच्छित आहेत.

महाराणा प्रताप यांच्याशी निगडीत नवे पुस्तक त्याचे ताजे उदाहरण! नव्या पुस्तकात हळदीघाटच्या लढाईत अकबराच्या सैन्याचा पराभव झाला होता, असे म्हटले आहे. ‘राष्ट्ररत्न महाराणा प्रताप’ नावाचे हे इतिहासाचे नवे पुस्तक राजस्थान भाजपचे तीन मोठे नेते माजी उच्चशिक्षणमंत्री, शालेय शिक्षणमंत्री आणि नगरविकासमंत्र्यांच्या शिफारशीने पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी ‘संदर्भ ग्रंथ’ म्हणून विद्यापीठाच्या सूचीत समाविष्ट करण्यात आले आहे.

इतिहासाची पुस्तके बदलण्याची मागणीही केली जात आहे. एखादा चित्रपट निर्माता इतिहास चुकीच्या पद्धतीने चित्रित करत असेल अथवा इतिहासाच्या नावावर काही चुकीची माहिती शिकवली जात असेल तर त्याचा विरोध नक्कीच व्हायला हवा. मात्र तो ठोस पुराव्यांच्या आधारांवर व तर्कसंगत पद्धतीनेच झाला पाहिजे. आजचा काळ सत्याला वळसा घालण्याचा आहे. इतिहासजमा झालेल्या वास्तवाच्या सावलीत सारे जगू इच्छितात; पण भावनांच्या आधारे इतिहासाची मोडतोड होणार नाही याचीही काळजी घ्यायलाच हवी.

महाराणा प्रताप यांची गाथा भारतीय इतिहासाचा एक गौरवपूर्ण अध्याय आहे. स्वातंत्र्य, अधिकार आणि अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष अनोखा होता. यासाठी ते देशाचे इतिहासपुरुष मानले जातात. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या नायकांच्या कीर्तीगाथांना आणखी महिमामंडित करण्यासाठी इतिहास बदलण्याची आवश्यकता नाही. त्यांचा संघर्ष, शौर्य आणि महानतेला प्रस्थापित करण्यास पुरेसा इतिहास उपलब्ध आहे.

इतिहासाच्या पुस्तकांतील माहितीनुसार सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी १८ जून १५७६ ला हळदीघाटात महाराणा प्रताप आणि मुगल सम्राट अकबर यांच्या सैन्यांत घनघोर युद्ध झाले होते. चार तास हे युद्ध चालले होते. महाराणा प्रतापांना मागे हटावे लागले होते; पण महाराणा प्रताप आणि त्यांच्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य अप्रतिम होते, असेही इतिहासात लिहिले आहे. लवकरच त्यांनी कुंभलगडावर पुन्हा वर्चस्व मिळवले ही गोष्ट वेगळी! तरीही या पराभवातसुद्धा त्यांचा विजय दडलेला होता.

केवळ एखाद्या सम्राटाला पराभूत केले म्हणून महाराणा प्रताप महान ठरतात असे नाही. त्यांचे मोठेपण त्यांनी केलेल्या आजीवन संघर्षात आहे. इतिहास हा राजांच्या जय-पराजयाची गाथा असू शकतो; पण ज्यात देशातील इतिहासपुरुषांचे मोठेपण चित्रित केले आहे तीच या गाथेची सोनेरी पाने ठरतात. विजय हा त्या महानतेचा अनिवार्य अथवा एकमेव आधार नव्हे. तथापि आज इतिहास बदलण्याबाबतचा वाद वा हट्ट चालू आहे.

त्यामागे कोणता हेतू असावा? भूतकाळातील चांगल्या गोष्टींचा अभिमान बाळगणे चूक नाही; पण अभिमानासाठी चांगलेपणाच्या नव्या प्रतिमा उभाराव्यात अथवा वस्तुस्थितीच बदलावी हे मात्र योग्य नाही.

महाराणा प्रताप हिंदू होते. अकबर मुस्लिम होते हे खरे; पण हळदीघाटची लढाई हिंदू-मुस्लिमांची लढाई नव्हती. या लढाईत अकबराच्या सेनेचे नेतृत्व राजा मानसिंह करत होते तर शेरशाह सुरीचा वंशज हकीम खान सूर हा महाराणा प्रतापांच्या बाजूने लढत होता. अकबर आपल्या साम्राज्याचा विस्तार करू पाहत होते आणि राणाप्रताप मेवाड वाचवू पाहत होते. इतिहासाला इतिहासाच्याच दृष्टीने पाहायला हवे. त्या

ला आजच्या संदर्भांचा ठिगळ लावून पाहणे म्हणजे विकृत प्रतिमा पाहण्यासारखे आहे. इतिहासाच्या उजळ अध्यायांवर अभिमान बाळगता येतो. तसेच इतिहासाच्या काळ्या अध्यायातून बोधही घेता येऊ शकतो. तथापि आजच्या राजकीय गरजांनुसार इतिहासाकडे पाहण्याचा अथवा बदलण्याचा अर्थ केवळ वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे ठरेल. एवढेच नाही तर ऐतिहासिक वास्तवाच्या शोधाचा कठीण मार्ग आणखी कठीण होऊन बसेल.

सांप्रदायिकतेच्या चष्म्यातून इतिहासाकडे पाहण्याचा वा तसा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न देशाच्या ऐक्याला कमकुवत बनवत आहे. आपण आज सावध झालो नाही तर उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल.

महाराणा प्रताप यांना श्रेष्ठ दाखवण्यासाठी अकबर यांची प्रतिमा लहान करण्याची काही गरज नाही. पाठ्यक्रमात अशा तर्‍हेचे बदल करून युवकांची बौद्धिकता प्रदूषितच होईल. आपल्याकडे काही लोक व काही शक्ती पाठ्यपुस्तकांत बदल करण्याची वकिली करत आहेत.

पाकिस्तानातही असे काहीसे घडत आहे. हिंदू-रजपुतांसोबत संबंध प्रस्थापित करून अकबराने इस्लामचे नुकसान केले होते, असे पाकिस्तानातील शाळांत शिकवले जात आहे. सम्राट अकबराचे सामंजस्याचे धोरण सांप्रदायिक शक्तींना कधीही रुचले नव्हते. सौहार्द, समानता, उदारता आणि सहनशीलता हे अकबराच्या सामाजिक सलोख्याच्या धोरणाचे चार स्तंभ होते. त्या आधारावरच अकबराने दिन-ए-इलाही हा नवा धर्म सुरू केला होता.

पण तो धर्म फारसा वाढला नाही. यातून अकबरांची आकांक्षा नक्कीच स्पष्ट होते. पाकिस्तानातील सत्ताधार्‍यांनासुद्धा ते रुचत नाही. प्रत्येक धर्माचा स्वीकार करून अकबराने एकूण इस्लाम धर्म नाकारला होता, असे त्यांना वाटते. म्हणून पाकिस्तानातील पाठ्यपुस्तकांत अकबराला नाकारले जात आहे. कदाचित याच कारणाने भारतातील हिंदुत्ववाद्यांनासुद्धा अकबर पसंत नसावा. ही कट्टरता इतिहासाची वैरी नाही; पण देशाच्या येणार्‍या उद्याची म्हणजे भवितव्याची वैरी आहे. म्हणून या कट्टरतेने प्रभावित निर्णयांपासून चांगल्याची अपेक्षा कशी करावी? इतिहासाला नाकारून अथवा बदलून आपण स्वत:लाच फसवू.

इतिहासाकडून शिकण्याची गरज आहे. कट्टरता अथवा संकिर्णतेच्या लोलकातून दिसणारा इतिहास योग्य चित्र दाखवू शकत नाही. योग्य चित्र पाहूनच काही तरी शिकता येईल. योग्य ते शिकले तरच योग्य मार्गावर पुढे जाता येईल. अकबर आणि राणाप्रताप भारताचा इतिहास आहेत.

भारतीय इतिहासाचे ते नायक आहेत. त्यांचे कार्य त्यांना परिभाषित करत आहे. त्यांना हिंदू वा मुस्लिम नायकांच्या रूपात पाहण्याचा अर्थ इंग्रजी इतिहासकारांच्या नजरेतून त्यांना पाहण्यासारखे ठरेल. इंग्रजांच्या दृष्टीने मध्यकालीन भारताची समग्र कथा हिंदू-मुस्लिमांमधील संघर्षाची कथा होती. वस्तूत: अकबर आणि राणाप्रताप यांसारख्या नायकांनी आपापल्या पद्धतीने इतिहास निर्माण केला आहे.

दोघांमध्ये तुलना करण्याची अथवा कोणाला कमी श्रेष्ठ समजण्याची गरज नाही. नायकांच्या कर्तृत्वानेच इतिहास घडतो. त्यांचे कर्तृत्व समजून घेऊन त्यापासून बोध घेण्याची गरज आहे. तसे झाले तरच उद्यासाठी प्रेरक ठरणारा वास्तवाधारी इतिहास निर्माण होऊ शकेल.
– विश्‍वनाथ सचदेव
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत आहेत.)

LEAVE A REPLY

*