गणवेश वाटप प्रक्रियेचा खेळखंडोबा

0
जळगाव / जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या 1892 शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या सर्व मुली व एस.सी. एस.टी व बीपीएल कार्डधारक मुलांना सर्व शिक्षा अभियांनातंर्गत गणवेश देण्यात येणार आहे.
यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांसह त्यांच्या आईच्या नावे बँकेत खाते उघडून गणवेशाच्या 400 रुपयांचे अनुदान थेट खात्यात देण्यात येणार आहे.
परंतु यासाठी 500 रुपयांचे बँकेत खाते उघडावे लागत आहे. त्यामुळे गणवेश वाटपाची प्रकिया चांगलीच लांबणार असल्याने या प्रकियेचा चांगलाच खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी गणवेश खरेदीची रक्कम जि. प शिक्षण विभागामार्फत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे वितरीत केली जात होती. त्यानंतर ती तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येत होती.

परंतु या खरेदीच्या प्रक्रियेत अनियमितता होत असल्याने दरवर्षी तक्रारी प्राप्त होत असायच्या. त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने गणवेश वाटपाचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात देण्याचे ठरविले आहे.

दरवर्षी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात येते. यावर्षी शासनाने गणवेशाचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्याचे ठरविले असून यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांला त्यांच्या आईसोबत बँकेत खाते उघडावे लागणार आहे.

एका गणवेशासाठी 200 रुपये तर दोन गणवेशसाठी 400 रुपये लाभार्थी विद्याथ्यार्ंना मिळणार आहे. परंतु त्यासाठी पालकांना बँकेत 500 रुपये भरून खाते उघडावे लागणार आहे.

त्यामुळे लाभार्थांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. 400 रुपयांच्या गणवेशाचे बिल मुख्याध्यापकांकडे दिल्यानंतर गणवेशाचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

परंतु अद्याप बर्‍याचशा शाळेतील लाभार्थी विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडलेली नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नसल्याने या प्रक्रियेमुळे गणवेश वाटपाची प्रकिया लांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

8 दिवसांत शाळांच्या खात्यावर निधीचे वाटप
जिल्हयातील 1892 जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळेतील 1 लाख 59 हजार 619 लाभार्थ्यांच्या खात्यावर गणवेशाचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी 6 कोटी 38 लाख 47 हजार 600 रुपयांचा निधी मंजुर असून येत्या 8 दिवसात तालुकास्तरावरून शाळांच्या खात्यांवर निधीचे वाटप करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*