खा. शेट्टींकडून शेतकर्‍यांची घोर फसवणूक; शेतकरी संघटनेचा आरोप; सुकाणू समितीत फूट

0

नाशिक । शासनाने केलेल्या कर्जमाफीचे निकष हे शेतकरी संघटनेला मान्य नाहीत. शेतीप्रश्नांची पुरेशी जाण नसलेल्या नेत्यांशी कर्जमाफीबद्दल चर्चा केली जाते हा खरे म्हणजे विनोदच आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यासाठी कामगार नेते जातात ही न पटणारी बाब आहे. एकीकडे सरकारमध्ये प्रतिनिधी ठेवायचे आणि दुसरीकडे सरकारविरोधात रस्त्यावर उतरायचे खा. राजू शेट्टी यांचे हे कोणते शेतकरी प्रेम, असा सवाल करत खा. राजू शेट्टी यांनी सरकारशी बोलणी करून जी कर्जमाफी करून घेतली ती फसवी असून यात 70 टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या कर्जमाफीला विरोध दर्शवत शेतकरी संघटनेने आंदोलन छेडण्याचा इशारा नाशिक येथे दिला.

पुणतांब्यानंतर शेतकरी आंदोलनाचे केंद्रबिंदू बनलेल्या नाशिकमधून शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवली जाऊ लागली. खा. राजू शेट्टी यांनीही नाशिकमधून आंदोलनाची हाक देत आंदोलन छेडले. सरकारने याची दखल घेत सुकाणू समिती गठित करून त्यांच्याशी चर्चा करत शेतकर्‍यांना कर्जमाफी मंजूर केली. मात्र सुकाणू समितीतील काही सदस्यांनी या कर्जमाफीला विरोध दर्शवत ही कर्जमाफी म्हणजे शेतकर्‍यांची निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप केला.

या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथे शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. यावेळी बोलताना संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पाटील म्हणाले, सरकारने लागू केलेली कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. मुळात शेतकर्‍यांना कर्जमुक्ती हवी आहे, परंतु कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्या सुकाणू समितीच्या सदस्यांशी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा केली गेली त्या नेत्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नातले काही कळते का, असा सवाल करत खा. राजू शेट्टींवर निशाणा साधला.

सुकाणू समितीने केवळ श्रेय लाटण्यासाठी शेतकर्‍यांचा विश्वासघात केला. राज्यस्तरावर यश न आल्यानेच आता राष्ट्रीय स्तरावर आंदोलन छेडण्याची वेळ आल्याचे सांगत खा. शेट्टींनी शेतकर्‍यांचा विश्वासघात केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शरद जोशींच्या अर्थशास्त्राची बैठक या निर्णयातून दिसून येत नाही. कर्जमाफी सरसकट की तत्त्वतः, 30 जूनपर्यंतच कर्जमाफी, सातबारा अजून कोरा नाही, कुटुंब हा घटक या निकषांबाबत संघटनेला आक्षेप आहे.

त्यामुळे सरकार आणि सुकाणू समितीने केलेल्या या फसवणुकीबाबत विभागवार मेळावे घेऊन शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणार असून त्यानंतर होणार्‍या राज्यव्यापी मेळाव्यात आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली जाईल. त्यामुळे नजीकच्या काळात लवकरच सरकारविरोधात मोठे आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अनिल घनवट, मानवेंद्र काचोळ, गुणवंत पाटील, वामनराव जाधव, गिरीधर पाटील, सुरेखा ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*