खरवंडीचे उपसरपंच फाटके अपात्र

0

नाशिक विभागीय आयुक्तांचा आदेश, पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतीस कुलूप लावल्याचे प्रकरण

 

नेवासा (का. प्रतिनिधी)- ग्रामपंचायतीला पाच दिवस कुलूप लावल्याप्रकरणी तालुक्यातील खरवंडीचे उपसरपंच अजित रामचंद्र फाटके यांना अपात्र (अनर्ह) ठरविण्याचा आदेश नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिला आहे.
खरवंडीचे उपसरपंच अजित रामचंद्र फाटके यांनी 21 ते 26 ऑक्टोबर 2015 या काळात ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले होते.©

 

याबाबत ग्रामविकास अधिकारी बी. एस. महाजन यांनी 29 मार्च 2016 रोजी लेखी अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर केला होता. त्यात त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) अन्वये कार्यवाही होण्याची विनंती करण्यात आली होती. गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे पाठविला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत अपात्रता अपील (क्र. 7/2016) विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे सादर केले होते.

 

 

त्यावर सुनावणी होऊन निकाल देण्यात आला. उपसरपंच अजित फाटके यांच्यावतीने बाजू मांडण्यात आली की, ग्रामविकास अधिकारी यांनी केलेले गैरकृत्य उघडकीस आणल्याने द्वेषातून खोट्या तक्रारी करून खोट्या मजकुराचा अहवाल पाठविला. त्यामुळे चौकशी अहवाल फेटाळून लावावा.
सामनेवाला यांचे म्हणणे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल व संचिकेतील कागदपत्रे विचारात घेऊन श्री. फाटके यांनी सादर केलेला दस्तावेज वस्तुस्थितीस धरून नसून जाणीवपूर्वक ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले असल्याचे विभागीय आयुक्तांनी म्हटले.

 

 

कामकाज बंद पाडून पदाचा दुरुपयोेग केला असल्याचे व त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार कार्यवाही करण्याचे कळविले आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या 13 जुलै 2016 च्या पत्रात उपसरपंच अजित रामचंद्र फाटके यांनी दि. 21 ऑक्टोबर 2015 रोजी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावल्याबाबत पंचनामा करण्यात आला असून त्यावर गोरक्षनाथ विश्‍वनाथ कुर्‍हे, कैलास अंबादास फाटके, भरत संतराम फाटके, आबासाहेब जबाजी फाटके व दत्तात्रय माधव थोरात यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. दि. 26 ऑक्टोबर 2015 रोजी ग्रामपंचायत कार्यालय उघडले त्यावेळी केलेल्या पंचनाम्यावर देखील पाच ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

 

अजित रामचंद्र फाटके यांनी 21 ऑक्टोबर रोजी कोणतीही पुर्वसूचना न देता कुलूप लावल्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

 

 

खरवंडीचे सरपंच अजित रामचंद्र फाटके यांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावून कामकाज बंद पाडून त्यांनी पदाचा दुरुपयोग करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचे सिद्ध होत असल्याने ते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार उपसरपंच पदावर राहण्यास अनर्ह ठरविण्यास पात्र ठरतात. त्यांना उपसरपंच पदावर राहण्यास निरर्ह ठरविण्यात येत असून संबंधितांना निर्णय कळविण्यात यावा असे नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी निकालात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*