केडगावकरांचा हंडा मोर्चा

0
केडगाव (प्रतिनिधी) – आठ-आठ दिवस पाणी न येणे, आलेच तर वेळेवर न येणे, ड्रेनेज, रस्ते व्यवस्थित नसल्याने मैला मिश्रीत पाणी येणे आदी समस्यांनी त्रस्त अथर्व नगर, ठुबे मळा, विठ्ठल नगर, देवी रोड केडगाव येथील महिलांनी मनपाच्या केडगाव येथील उपकार्यालयावर हंडा मोर्चा काढत संताप व्यक्त केला.

निवडणुका संपल्यावर नगरसेवक कधीच दिसले नाहीत, पाणी सोडणारी व्यक्ती फोन केला असता महिलांशी नीट बोलत नाही, या तक्रारी कोण सोडवणार, असा आरोप करत केडगावच्या उप कार्यालयातच आंदोलन सुरू केले.

कोणतेही राजकीय नेतृत्व नसलेल्या या मोर्चात कविता बिचकर, मंजुषा पाठक, मीरा घोडके, वर्षा बडवे, सोनाली कुलकर्णी, कल्याणी सूर्यवंशी, सुनिता दुधवणे, वंदना भोसले, सुनिता वाघमारे, सुलोचना गारुडकर, श्रेया जोशी, साधना घुले, पदमा तांबे, सारिका सूर्यवंशी, रेखा पावसे, संगीता आंधळे, सरोजिनी खेवट सहभागी झाल्या. आंदोलनाच्या ठिकाणी निवडणुकानंतर पहिल्यांदा त्यांना प्रभागातील नगरसेवकाचे दर्शन झाले. अनेक महिलांना तर नगरसेवक लोंढे यांचे पूर्ण नावच माहित नव्हते.

पाणी समस्येने स्वत: त्रस्त असलेले नगरसेवक सुनील कोतकर यांनी या महिलांशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पाणी सोडणारी व्यक्ती व प्रभागातील महिलांच्या समस्या या दोन्ही बाजू यावेळी समजून घेत योग्य कारवाई करून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरवा करण्याचे आश्‍वासन कोतकर यांनी दिले.

दुषित पाण्यामुळे लहान मुले व वयोवृद्ध यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खराब रस्ते व ड्रेनेज दुरावस्था यामुळे आजार वाढत असून पाणी वेळेवर न येण्यामुळे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पालिकेने या परिसरातील समस्या सोडविल्या नाही तर येत्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्धार अथर्व नगर, ठुबे मळा, विठ्ठल नगर, देवी रोड परिसरातील महिलांनी केला.

LEAVE A REPLY

*