कृषी आयुक्तालयातील कर्मचार्‍यास, कट्टा लावून लुटले

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – पुण्याच्या कृषी आयुक्त कार्यालयातील कर्मचार्‍यास नगर तालुक्यातील कामरगाव येथे डोक्याला कट्टा लाऊन लुटल्याची घटना शनिवारी (दि.3) रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.

 

 

यात बाबासाहेब गोरक्षनाथ कराळे (रा. भोसरी) यांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कागदपत्रे असा 32 हजारांचा मुद्देमाल लुटला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 
कराळे हे मूळ पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे येथील रहिवासी आहेत.

 

 

ते पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयात 2013 पासून कार्यरत आहेत. शुक्रवारी ते गावी आले असता त्यांना अचानक काम निघाल्यामुळे ते पुण्याला चालले होते. शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते नगर-पुणे बस स्थानकावर बसची वाट पाहत उभे होते. दरम्यान त्यांच्याजवळ एम. एच. 12 बीएन 9271 ही कार आली. पुण्याला जायचे आहे का अशी विचारणा करून त्यांनी कराळे यांना कारमध्ये घेतले. कामरगाव शिवारात असताना कारमधील तिघांनी कराळे यांना अचानक मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांनी प्रतिकार केला असता त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावून त्यांच्याकडील सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल, कागदपत्रे असा 32 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला.

 

 

हा प्रकार कोणाला सांगाल तर ठार मारू असे म्हणून मारहाण करून कारमधून ढकलून दिले. वाहन पुण्याकडे न जाता पुन्हा नगरकडे वळवून ते भरधाव निघून आले

 

 
दरम्यान कराळे यांनी कामरगाव शिवारातील एका हॉटेल मालकास हा प्रकार सांगितला. त्यांच्या मदतीने कराळे हे एका ट्रकमध्ये बसून पुण्याला गेले. त्यांचे कार्यालयीन काम आटोपल्यानंतर काल कोतवाली पोलीस ठाण्यात हजर होऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड करीत आहेत.

 

 

प्रवाशांनी जागरुकता पाळणे गरजेचे
प्रवाशांना अशा प्रकारे रस्तालूट करणारे काही आरोपी यापूर्वी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. या घटना टाळण्यासाठी प्रवाशांनी दुरचा प्रवास शक्यतो बसने करणे गरजेचे आहे. तसेच प्रवासादरम्यान आपल्याकडे जास्त रक्कम, मौल्यवान वस्तू अशा गोष्टी टाळाव्यात. बस स्थानक परिसरात जर कोणी लुटत असल्याची किंवा संशयित व्यक्ती वस्तु आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. या घटनेची उकल करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
– अक्षय शिंदे (सहायक पोलीस अधीक्षक)

LEAVE A REPLY

*