कुकडीच्या पाणी प्रश्‍नावरून शेतकरी आक्रमक

0

आमदार जगताप यांचा पुतळा जाळला; तहसील कार्यालयाला टाळे ठोकले

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – कुकडी कालव्याच्या सुरू असलेल्या आवर्तनातून 132 मायनर चारीचे पाणी बंद करून हे पाणी विसापूर आणि मोहोरवाडी तलावांत घेऊन आमदारांनी स्वार्थाचे राजकारण केल्याच्या निषेधार्थ भाजपचे नगरसेवक सुनील वाळके यांनी समर्थकांसह एकत्र येऊन श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांचा पुतळा जाळला.
तर काही शेतकर्‍यांनी याच वेळेस तहसील कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकून पाण्याची मागणी केली.
गेल्या 25 एप्रिल रोजी कुकडीचे सुटलेले आवर्तन आ. जगताप यांनी समर्थकांसह तीन दिवस कालव्यात ठिय्या आंदोलन करून विसापूर तलावात सोडून घेतले. पुन्हा स्टंटबाजी करत आंदोलने केली. मात्र दिनांक 13 मे रोजी 132 मायनर चारीचे पाणी शेतकर्‍यांनी घेतले असता, यात राजकारण करून एक दिवस सुद्धा चारीला पाणी जाऊ न देता चारीचेगेट तोडल्याचे कारण पुढे करून खाली येणारे सर्व पाणी कुकडीच्या अधिकार्‍यावर दबाव आणून बंद केले.
हे बंद केलेले पाणी विसापूर धरणात वळवून घेतले. 110 किलोमीटरच्या खालच्या शेतकर्‍यांच्या फळबागा जळत असताना पाणी बंद करून केवळ विसापूरचे आमदार असल्याप्रमाणे पाणी विसापूर मध्ये घेतले. उर्वरीत तालुक्यातील शेतकरी हे आमदाराच्याच मतदारसंघात आहेत.
मग आमच्यावर अन्याय करत पाणी बंद केल्याने फळबागा आणि पिके पाण्यावाचून जळत असल्याने नगरसेवक सुनील वाळके यांच्यासह शेतकर्‍यांनी आ. राहुल जगताप यांच्या या कृतीचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळला. यावेळी आमदार जगताप यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणाही दिल्या. आमदार जगताप यांचा पुतळा जाळत असताना पोलिसांनी हस्तकक्षेप करत पेटलेला पुतळा विझवण्याचा प्रयत्न केला.
आमदार जगताप यांचा पुतळा जाळण्याचे आंदोलन सुरू असताना काही शेतकर्‍यांनी पाणी मिळावे म्हणून तहसील कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले. या दोन्ही आंदोलनांमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या दोन्ही प्रकरांमुळे आंदोलक शेतकर्‍यांना दोषी धरत 14 आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महसूल कर्मचारी हांडोळे यांनी फिर्याद दिली. गुन्हे दाखल झालेल्या शेतकर्‍यांमध्ये नगरसेवक सुनील वाळके, गोरख आळेकर, विलास रसाळ, गौतम खेतमाळीस, बाळासाहेब खेतमाळीस, दशरथ लांडगे, कैलास मखरे, प्रदीप मोटे, राजेंद्र आनंदकर, बाळासाहेब मोटे, नितीन पांढरकर, माणिक शेंडगे, बाळासाहेब मखरे यांचा समावेश आहे.

जामीन घेण्यास
वाळके यांचा नकार
कुकडीचे पाणी फळबागांना देणे गरजेचे असताना 132 चे पाणी बंद करण्यास अधिकार्‍यांवर दबाव आणून ते पाणी आमदारांनी विसापूर मध्ये घेतले. आमची पिके जळत असताना आमदांरानी पाणी स्वतःच्या कारखान्यासाठी घेतले. सकारात्मक मार्गाने पाणी मिळाले नाही. कायमच शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. आंदोलन करणार्‍यांना पोलीस अटक करत असतील आणि पाणी मिळत नसेल तर जेल मध्ये बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत नगरसेवक सुनील वाळके आणि सहकारी यांनी जामीन नाकारला.

LEAVE A REPLY

*