कारभारी सेवेत रुजू

0

कलेक्टर महाजन, एसपी शर्मा यांनी घेतला पदभार

अभय महाजन यांनी जिल्हाधिकारी पदाचा पद्भार स्वीकारण्यापूर्वी नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात सपत्नीक महापूजा केली. त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडून त्यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीत पाणी टंचाईचे नियोजन करणे हे त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे. गत तीन वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेत कामे झाले असून ते काम पुढे जोमाने नेण्याचे काम महाजन यांना करावे लागणार आहे. यासह जिल्ह्यातील आरोग्य, घटलेला मुलींचा जन्मदर हेही प्रश्‍न महाजन यांना हाताळावे लागणार आहेत. साईबाबा समाधीचे शताब्दी वर्ष यंदा साजरे होणार असून याठिकाणी जगभरासह देशातील भाविकांचा मांदियाळी राहणार आहे, त्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. 

नवे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मावळते पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्याकडून पद्भार स्वीकारला. श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार हेही जिल्ह्यात नव्याने आले आहेत. जिल्ह्यात अवैध धंद्यांनी वर काढलेले डोके, पोलिसांची सामान्य जनतेत डागाळलेली प्रतीमा उंचविण्याबरोबरच जिल्हा पोलीस दलास ‘शिस्तीचे धडे’ शर्मा यांना द्यावे लागणार आहेत. जिल्ह्यात खुलेआम बेकायदा दारू विक्री, मटक्याचे अड्डे, अवैध प्रवासी वाहतूक, शहरातील बेशिस्त वाहतूक मोडीत काढत शिस्त लावण्याचे मोठे आव्हान शर्मा यांच्यासमोर असणार आहे. जिल्हा पोलीस दलातील ‘काय-द्याची’ भाषा मोडीत काढून पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना खाकीची शान वाढविण्यासाठी धडे द्यावे लागतील. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हानही शर्मा यांच्यासमोर असणार आहे.

LEAVE A REPLY

*