करोडोंचे दरोडे

0
दरोडे पूर्वीही पडत होते आणि आताही पडत आहेत. पूर्वी दरोडेखोर नावाचा वेगळा वर्ग हे उद्योग करत होता. चोराचिलटांना पोलीस यंत्रणेचा धाक वाटतो असे मानले जात होते; पण आता दरोडेखोरांची जागा पोलिसांनीच घेतली असावी का? अशा घटना उघडकीस येत आहेत.

 

पोलिसांनीच दरोडे घातल्याच्या किंवा नागरिकांना लुटल्याच्या घटना एका रात्रीत वाढलेल्या नाहीत. रेल्वेतील प्रवाशांच्या सामानाची चोरी होते. त्यात अनेकदा रेल्वे पोलिसांची भागीदारी असते असे म्हटले जाते; पण कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरच्या शिक्षक कॉलनीतील दरोड्याचा संशयास्पद तपास पोलिसांना चांगलाच भोवला आहे.

कॉलनीत ९ कोटींचा दरोडा पडला होता; पण तपासात फक्त सव्वाचार कोटीच सापडले. उर्वरित रक्कम पोलिसांनीच लांबवली या आरोपाखाली आता ९ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वर्ष-दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटना जनता विसरलीही असेल. कासव तस्करी प्रकरणी ब्लॅकमेलिंग करून लूट करणार्‍या आष्टा ठाण्यातील पोलिसांची बनवेगिरी उघडकीस आली होती. एक कोटी रुपयांची रोख रक्कम घेऊन मुंबईहून मंगळुरूला खासगी ट्रॅव्हल्स बसने जाणार्‍या व्यापार्‍याला पोलिसांनीच लुटले होते.

सरळमार्गी उद्योजकांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून निधी आणि जमिनी लाटण्याचा उद्योग पुणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आरंभल्याची घटना फार जुनी नाही. काही दरोड्यांचा तपास यशस्वीपणे पूर्ण होतो तर काही दरोड्यांची फाईल कायमची बंद होते.

बंद झालेल्या तपासात संशयाची सुई मात्र थरथरतच राहते. पोलीस आणि गुन्हेगारांमधील मिलीभगत यासाठी कारण ठरत असेल का? गफल्यांमधील वाटा पोलिसांपर्यंत पोचता होतो असे बोलले जाते. ती चर्चा अगदीच तथ्यहीन असेल का? कायदा आणि सुव्यवस्था राखून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी पोलिसांवर असते.

अलीकडे मात्र गुन्हेगारांबद्दल नेत्यांप्रमाणेच पोलिसांचाही दयाभाव वाढता आहे. गावोगाव अनेक घटनांतून तो जनतेच्या निदर्शनास येत आहे. त्यांनाच आपल्या कर्तव्याचा विसर पडत असावा? कुंपणच शेत खात असेल तर पंतप्रधानांचा भ्रष्टाचार निर्मूलनाचा इरादा कसा सफल होणार?

पंतप्रधानांनी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना चार मोलाच्या गोष्टी सुनावल्या आहेत. नेत्यांचे एखादे चुकीचे विधान अनेक चांगल्या कामांवर बोळा फिरवू शकते, याचे भान राखण्याचा त्यांना सल्ला दिला होता. तो सल्ला पोलीस खाते लक्षात घेईल का?

LEAVE A REPLY

*