एक प्रभागातील नावे दुसर्‍या प्रभागात ; कृपा कोणाची?

घोळास जबाबदार अधिकार्‍यांवरील कारवाईकडे नाशिककरांचे लक्ष

0

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंचवटी प्रभागासह शहरातील काही प्रभागांत इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर आता मतदार याद्यांत मोठा घोळ झाल्याची कबुली खुद्द प्रशासनाने दिली आहे.

या घोळास महसूल विभागाने महापालिकेकडे बोट दाखवल्यानंतर महापालिकेने हा आरोप फेटाळला आहे. या घोळामुळे हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले असून या घोळास जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर या दिवशी शहरातील बहुतांशी ठिकाणी मतदारांना केवळ नावे सापडत नसल्याने मतदान करता आले नाही. यासंदर्भात मोठ्या तक्रारी समोर आल्या. यातून मोठा असंतोष निर्माण झाला होता. निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि.23) घोषित झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत मतदार याद्यांतील घोळाची चौकशी केली.

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या प्रभागानुसार फोडल्यानंतर यात घोळ झाल्याने या घोळास महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी जिल्हा प्रशासनाचा आरोप फेटाळला आहे. जिल्हा प्रशासन व महापालिका यांच्यातील या वादामुळे प्रशासकीय गंभीर चूक समोर आली आहे. या चुकीमुळे शहरातील हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले असून परिणामी अजून वाढणार्‍या मतदानाच्या टक्केवारीला ब्रेक लागला आहे.

जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या महापालिकेकडे सुपूर्द केल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने या याद्या प्रभागनिेहाय करून त्या ठराविक लोकसंख्येनुसार 31 प्रभागांची विभागणी करीत या प्रारूप प्रभाग याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. निवडणूक कार्यक्रमानुसार या प्रारूप प्रभाग याद्यांवर सूचना व हरकती मागवण्यात आल्यानंतर मुदतीत हजारो आक्षेप महपालिकेकडे प्राप्त झाले होते. यानुसार महापालिकेने दुरुस्तीचे काम केले. मात्र आक्षेपांची संख्या लक्षात घेता महापालिकेने 21 जानेवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केलीच नाही.

या प्रभागनिहाय यादीतील घोळामुळे महापालिकेने दोन दिवस उशिरा अंतिम प्रभागनिहाय यादी प्रसिद्ध केली. हीच महापालिकेची चूक निवडणुकीच्या दृष्टीने गंभीर होऊन प्रभाग यादीत मोठ्या प्रमाणात घोळ राहिल्याचे मतदानाच्या दिवशी समोर आले.

महापालिकेने सूचना, हरकती घेऊन तयार केलेल्या अंतिम प्रभाग यादीत अनेक प्रभागांतील याद्यांतील चुका तशाच राहिल्या. या चुकांत प्रभाग 2 मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले आहे. यात आडगाव गावातील पत्ता असलेल्या हजारो मतदारांची नावे कोणार्कनगरमध्ये टाकण्यात आली.

तर कोणार्कनगर भागातील मतदारांची नावे आडगाव गावातील बूथवर टाकली गेली. असाच प्रकार प्रभाग 5 मध्ये झाला. पेठरोड भागातील शाळांत नावे असलेल्या मतदारांची नावे ही पुणे विद्यार्थी वसतिगृहातील मतदान केंद्रात जोडण्यात आली. अशीच प्रभाग 1 मधील नावे ही प्रभाग 6 मधील मतदान केंद्रात असल्याचे समोर आले.

अशाप्रकारे एका प्रभागातील नावे शेजारील प्रभागात टाकली गेल्याचे समोर आले आहे. तर प्रभाग 21 मधील मतदारांची नावे चक्क प्रभाग 2 मध्ये टाकण्याचे काम झाल्याचे या घोळातून समोर आले. अशाप्रकारे प्रभागनिहाय मतदार याद्या बनवताना अनेक पराक्रम महापालिका कर्मचार्‍यांनी केले आहेत. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास महापालिकेने तब्बल दोन-तीन दिवस उशीर केला.

यासंदर्भात राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. एकूणच प्रारूप प्रभाग याद्या जाहीर करून त्यावर हरकती, सूचना घेऊनही यात मोठ्या चुका राहिल्याने यात चूक कोण, याचे उत्तर आता समोर आले आहे. हा घोळ कोणाच्या सांगण्यावरून झाला का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे हजारो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर राज्य निवडणूक आयोग आता कोणती कारवाई करणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*