एकच प्याला, महागात पडला; हॉटेल उमराववर छापा

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- पाईपलाईन रोडवरील हॉटेल उमराववर गुरूवारी रात्री 11.30 च्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून 28 मद्यपींना अटक केली. पाईपलाईन रोडवरील या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मद्य विक्री सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांना हॉटेल उमरवममध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मोठ्या फौजफाट्यासह रात्री 11.30 च्या सुमारास हॉटेल उमराव येथे छापा टाकला. त्यावेळी हॉटेलमध्ये 28 जण मद्य पित बसले होते. या सर्वांना ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणी करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच हॉटेलचालक विशाल पवार याला ताब्यात घेण्यात आले.
हॉटेलच्या जागामालकासही संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले.त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाला या ठिकाणी 13 हजार 500 रूपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत. हा माल जप्त करण्यात असून आरोपींवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी सापडलेला दारू साठा हा वाईन शॉपमधून खरेदी केलेला आहे. संबधीत वाईन शॉपवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
यापूर्वी 15 तारखेला पाईपलाईन रोडवरील काही टपर्‍या व हॉटेल या ठिकाणी छापे टाकून 10 तळीरामांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी रात्रीची कारवाई अधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी.ए.जवळीकर, दुय्यम निरक्षक दहिवडे, दुय्यम निरक्षक बी.एस.गलांडे, योगेश मडके, दिलीप पवार, रूपेश चव्हाण, अविनाश कांबळे, गदादे यांनी केली.

 

LEAVE A REPLY

*