उमज पडेल का?

0
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ धावणार्‍या महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेला नुकतीच ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत. दिवसेंदिवस तोटा वाढत असताना महामंडळाने ६९ वा वर्धापनदिन फारच झोकात साजरा केला. मुंबईतील कार्यक्रमात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आपल्या नेहमीच्या शिवशाही थाटात आणखी एक जोरदार घोषणा केली. एसटी बसेसचे सारथ्य करण्याची संधी आता महिलांना दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

‘४५० महिला चालक एसटीच्या सेवेत रुजू करून घेतल्या जाणार आहेत. एसटी सेवेत महिला चालक रुजू होणार हे इतिहासात प्रथमच घडणार आहे’ असे सांगून ‘करेंगे, देंगे, दिलायेंगे’ अशा स्वरुपाच्या भविष्यकालीन घोषणा त्यांनी केल्या. विविध क्षेत्रात महिला कर्तृत्व गाजवत आहेत. तसेच एसटीतही त्या ‘वाहक’ म्हणून गेली काही वर्षे समर्थपणे काम करत आहेत.

महिलांना चालक म्हणून एसटी सेवेत संधी देण्याची परिवहनमंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह असली तरी ती प्रत्यक्षात आल्यानंतर त्याबद्दल जाहीरपणे बोलणे संयुक्तिक ठरले असते. तथापि टाळ्या वसूल करणार्‍या घोषणा राज्य सरकारमधील अनेक मंत्री गेली दोन-अडीच वर्षे नित्यनेमाने करत आहेत. त्यात कुठेही खंड नाही.

परंतु केलेल्या घोषणा प्रत्यक्षात किती उतरल्या? दुर्दैवाने ते प्रमाण फारच नगण्य असावे. याउलट विरोधकांवर दोषारोप करून आपल्या उणिवा झाकण्याचा बचावात्मक पवित्रा जबाबदार मंत्रिगण सातत्याने घेत आहेत. विरोधकांवर खापर फोडण्याच्या या वृत्तीला प्रजा आता कंटाळली असल्यास नवल नाही.

उमेद जागवणारे किती प्रयत्न सरकारकडून होताना दिसतात? धोरण म्हणून महिला चालकांना एसटी सेवेत घेण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली. ती येत्या किती वर्षांत प्रत्यक्षात उतरणार आहे हे त्यांनी का सांगितले नाही? याच सरकारच्या कारकीर्दीत महिलांच्या हाती एसटीचे सुकाणू येईल का? की त्यासाठी नवे सरकार अवतरण्याची वाट पाहावी लागेल? खुद्द परिवहनमंत्र्यांनासुद्धा याची कल्पना असावी.

म्हणूनच केवळ वेळ मारून नेणार्‍या घोषणा करण्याचे धोरण सरकारातील बर्‍याच उच्चपदस्थांनी स्वीकारले असेल का? घोषणांचा नुसता गजर प्रजेचा सरकारवरील विश्‍वास टिकवेल का? जनहिताच्या म्हणून आतापर्यंत ज्या घोषणा केल्या गेल्या त्यातील निवडक घोषणांचा तरी येत्या काळात अनुभव मिळावा, अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे. बघता-बघता विद्यमान सरकारची मुदत संपेल आणि त्यावेळी भरीव काही केल्याचे सांगायला हाती काहीच नसेल. आपल्या नाकर्तेपणाचा ठपका विरोधकांवर ठेवून आपल्यावरचा जनतेचा विश्‍वास टिकून राहील या भ्रमातून राज्यकर्ते लवकर बाहेर निघतील का?

LEAVE A REPLY

*