उतार्‍यासाठी ऑन‘लाईन’

0

बिल्डर मेटाकुटीला , ग्राहकांनाही मनस्ताप , महसूलचे सॉफ्टवेअर आउटडेटेड

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाने बांधकाम व्यावसायिकांसाठी नवे धोरण आणले असले तरी शासनाच्याच संगणकीकृत उतार्‍याच्या सिस्टीममुळे बिल्डर मेटाकुटीला आले आहेत. घरांच्या नोंदीला विलंब होत असल्याने ग्राहकांनाही मनस्ताप होत आहे. महापालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाचे सॉफ्टवेअर आउटडेटेड हे त्याचे मुख्य कारण असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
आर्किटेक्ट, इंजिनियर व सर्व्हेअर संघटनेने ही बाब जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. शासनाने उतार्‍यांचे संगणकीकरण केले आहे. खरेदी-विक्रीच्या नोंदीही ऑनलाईन होतात. पण गत सहा महिन्यापासून ग्राहकांना घरांचे उतारेच मिळत नाही. ऑनलाईन नोंदणीसाठी विलंब होत आहे. उतारे नसल्याने महापालिकेत नोंद होत नाही. पर्यायाने महापालिकेचा लाखो रुपयांचा कर बुडत आहे. बिल्डरने एखादा भूखंड विकसीत करण्यासाठी घेतला तर त्याचीही नोंद होत नाही. भूखंडाची नोंद होत नसल्याने तेथे नव्याने होणार्‍या बांधकामाचा प्लॅनही मंजूर होत नाही. त्यामुळे नव्याने बांधकामाला सुरूवात करता येत नाही. त्यातून बांधकाम व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. संगणकावरील उतारे मिळत नाही त्यामुळे बिल्डर मेटाकुटीला आले आहेत. तात्पुरत्या स्वरुपात लेखी उतारा हाच त्यावर उपाय असल्याचे बिल्डरांचे म्हणणे आहे.

एखाद्या बिल्डरने 5 हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट विकत घेतला तर त्यांची नोंद अगोदर तलाठ्याकडे होते. तीही ऑनलाईन. शासनाच्या नव्या धोरणानुसार नगर शहर हद्दीत 1.10 एफएसआय झाला आहे. शिवाय 30 टक्के प्रिमियम भरून तो 1.40 पर्यंत जातो. याशिवाय बहुतांश बिल्डर टीडीआर विकत घेतात. म्हणजेच 5 हजार स्क्वेअर फुटाच्या भूखंडावर बिल्डर जवळपास 7 हजार स्क्वेअर फुटाचे बांधकाम करू शकतात. पण तलाठ्याकडे केवळ 5 हजार स्क्वेअर फुटाची नोंद आहे. त्यापेक्षा अधिकची नोंद महसूल विभागाकडे होत नाही. पर्यायाने अतिरिक्त 2 हजार स्के.फुटाचे बांधकामाची नोंद कोठेच होत नाही. त्यामुळे बिल्डरला घरं विकताना अडचणी निर्माण होतात. नोंदच होत नसल्याने ग्राहकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

कलेक्टर म्हणाले, नंतर बघू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौर्‍यावर आले असता बिल्डर संघटनेने ही बाब त्यांच्याही निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बिल्डरांची बैठक बोलविली. मात्र त्याचा निर्णय झाला नाही. आता अभय महाजन हे नव्याने बदलून आले आहेत. संघटनेने त्यांच्याही कानावर ही बाब ंघातली. त्यांनी नंतर बघू असे उत्तर देत बिल्डरांची बोळवण केली आहे.

 

LEAVE A REPLY

*